कजर्त: लॉटरीच्या नावाने गंडा घालणो, रक्कम दुप्पट करु न देतो असे आमिष दाखवून फसविण्याचे प्रकार समोर येत असताना आता फेक कॉल करून बँकेतील किंवा एटीएममधील पैसे काढण्याच्या घटना समोर येत आहेत, मात्र पोलिसांच्या प्रश्नांत सापडू अशा भीतीने नागरिक तक्रारी करीत नाहीत, त्यामुळे अशा फेक कॉलवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन कर्जत पोलीस ठाण्याचे परीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक विनायक नरळे यांनी नागरिकांना केले आहे.
‘मी एलआयसी कार्यालयातील अधिकारी असून तुमच्या पॉलिसीचा लाभांश तयार आहे. तुम्ही ठरावीक रक्कम अमूक एका नावे धनादेशाद्वारे जमा करा, तुमचा धनादेश आमच्या कार्यालयात मिळताच पॉलिसीधारकाला लाभांश मिळेल, अशा खोटय़ा बतावणीचे दूरध्वनी येऊन नागरिकांकडून एलआयसीच्या नावाने पैसे उकळण्याचे प्रकार सध्या जोरात सुरू आहेत. याशिवाय एटीएम कार्ड किंवा पिनकोड बदलायचा आहे, असे सांगूनही फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. या टोळीने अनेकांना फसविल्याच्या घटना समोर आल्या आहेत, मात्र आपली फसवणूक झाली आहे, हे आपण कसे सांगायचे या लाजेखातर ती व्यक्ती पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल करीत नाही, अशा घटना घडल्या आहेत. त्यांना पायबंध घालण्यासाठी कर्जत पोलीस ठाण्याने नागरिकांना आवाहन केले आहे.
वैयक्तिक माहिती नको
4असे दूरध्वनी आल्यावर तुमची वैयक्तिक माहिती कोणाला देऊ नका, त्याची शहानिशा करा, खात्री करा आणि मगच त्याच्याशी बोला. तसे काही असेल तर बँक किंवा संबंधित कार्यालयाशी किंवा एजंटशी संपर्क साधा, अन्यथा जवळील पोलीस ठाण्याशी संपर्क साधा. फेक कॉलवर विश्वास ठेवू नका असे आवाहन कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस उपअधीक्षक विनायक नरळे यांनी नागरिकांना केले आहे.