नवी मुंबई : बनावट कागदपत्राद्वारे कर्ज घेऊन बँकेची ५८ लाख रुपयांची फसवणुक झाली असुन रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.घणसोली येथील युनियन बँक आॅफ इंडिया च्या शाखेत हा प्रकार घडलेला आहे. सहा जणांनी या बँकेतुन ५३ लाख ८० हजार रुपयांचे गृहकर्ज घेतले होते. याकरिता त्यांनी आवश्यक ती कागदपत्रे बँकेत जमा केली होती. मात्र कर्ज घेतल्यानंतर त्याची परतफेड होत नसल्याने बँकेने कागदपत्रांची तपासणी केली असता फसवणुक झाल्याचे समोर आले. त्या सहा जणांनी घर खरेदी विक्रीची बनावट कागदपत्रे सादर करुन बँकेतुन कर्ज घेतले होते. त्यानंतर कर्जाच्या मंजुर झालेल्या रकमेचा अपहार करुन बँकेची फसवणुक केली आहे. कर्जाची परतफेड होत नसल्याने त्यांनी जमा केलेल्या कागदपत्रांची पाहणी केली असता बँकेसमोर हा प्रकार उघड झाला. याप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र बँकेत जमा असलेल्या बनावट कागदपत्रांवर त्यांचे पत्तेही खोटे असल्याने पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)
बनावट कागदपत्रांद्वारे बँकेची फसवणूक
By admin | Updated: October 3, 2015 23:53 IST