नवी मुंबई : पैसे भरूनही दोन वर्षांत घराचा ताबा दिला नसल्याने, १२ ग्राहकांनी उलवेमधील बिल्डरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ६ कोटी १५ लाख ६४ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले असून, याविषयी एपीएमसी पोलिसांनी जिग्नेश गोरडीया व पंक्ती जिग्नेश गोरडीया विरोधात गुन्हा दाखल केला आहे.बोरीवलीमध्ये राहणाºया स्नेहा संजय गवंडी यांनी २०१५मध्ये नवी मुंबईमध्ये घर खरेदी करण्यासाठी विविध प्रकल्पांची पाहणी सुरू केली होती.गृहप्रकल्पांची पाहणी करताना, त्यांची काही एजंटबरोबर ओळख झाली. त्यांच्या मदतीने घरांची पाहणी सुरू करून, अखेर उलवे सेक्टर-३ मधील मपल विवा हा प्रकल्प दाखविला.तेथील घरे परवडणारी असल्याने, ती विकत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. येथील घराची किंमत ५५ लाख रुपये सांगण्यात आली, परंतु चर्चेनंतर ५० लाख ५५ हजार रुपये किंमत निश्चित करण्यात आली. बिल्डर जिग्नेश गोरडीया यांच्या सांगण्यावरून श्रीजी असोसिएट कंपनीच्या नावे धनादेश देण्यास सांगितले. त्यांनी जुलै २०१५पासूनजून २०१७पर्यंत घराची खरेदी करण्यासाठी ४८ लाख ६२ हजार रुपये दिले आहेत.या दरम्यान, बांधकामाच्या ठिकाणी जाऊन वारंवार पाहणी केली असता, काम पूर्ण केले जात नसल्याचे निदर्शनास आले.याशिवाय गवंडी यांनी घेतलेली सदनिका बिल्डरनी गोपाळ जुगलकिशोर बरासीया यांना विकल्याचे निदर्शनास आले व बरासीया यांनी पनवेल न्यायालयात सदनिकेचा ताबा मिळावा, यासाठी दावा दाखल केल्याचे निदर्शनास आले.सदनिकेचा ताबा मिळविण्यासाठी बिल्डरकडे वारंवार पाठपुरावा करूनही त्यांनी ताबा दिला नसल्याने, स्नेहा गवंडी व त्यांचे मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये नोकरी करत असलेले पती संजय गवंडी यांनी माहिती घेतली असता, त्यांची व मपल विवा प्रकल्पात गुंतवणूक केलेल्या इतरांचीही फसवणूक झाली असल्याचे निदर्शनास आले. फसवणूक झालेल्या सर्व १२ नागरिकांनी एकत्र बिल्डरच्या एपीएमसी पोलीस स्टेशनच्या जवळील कार्यालयात जाऊन पाठपुरावा केला, परंतु घराचा ताबा दिला नसल्याने, अखेर एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
बिल्डरकडून सहा कोटींची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 03:31 IST