पंकज पाटील ल्ल अंबरनाथतालुक्यातील काराव गावाजवळील मुलींच्या आश्रम शाळेत शिकणा-या काही ८ ते १० वयोगटातील मुलींचा विनयभंग शाळेच्याच निवासी अधिक्षकाने केला आहे. या प्रकारामुळे ग्रामिण भागात संतापाची लाट पसरली आहे. या प्रकरणी शाळेच्या मुलींनी पोलीसांकडे तक्रार केल्यावर अधिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारावरुन आदिवासी आश्रमशाळा ह्या सुरक्षित नसल्याचे उघड झाले आहे. अंबरनाथ तालुक्यातील बारवी धरण पट्टा आणि वांगणी पट्यात मोठ्या प्रमाणात आदिवासीयांची वस्ती आहे. या आदिवासीयांच्या मुलांना शिक्षण घेता यावे यासाठी काराव गावाजवळ उल्हास परिसर प्रतिष्ठान संचलीत निवासी आदिवासी आश्रमशाळा उभारण्यात आली आहे.या शाळेला सरकारी अनुदानही देण्यात येत आहे. या आश्रमशाळेत तब्बल ७० मुली शिक्षण घेत आहे. शिक्षण घेणा-या या मुलींना त्याच्याच शाळेतील अधिक्षकाकडून धोका निर्माण होईल याची किंचीतही कल्पना नव्हती. शाळेचा अधिक्षक अजितसिंग गिरासे हा वारंवार शाळेतील विद्यार्थीनींसोबत जवळीक साधून त्यांची छेड काढत होता. तसेच वारंवार अंगलट येण्याचा प्रयत्न करित आहे. येवढेच नव्हे तर या मुलींना अश्लिल चित्रपट दाखवून त्यांचा विनयभंग करित असे. २८ डिसेंबरच्या दिवशी हा प्रकार जास्त प्रमाणात घडल्याने या प्रकरणाची माहिती शाळेच्या चार पिडीत मुलींनी मुख्याध्यापकांना दिली. मात्र त्यांनीही या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले. अखेर हे प्रकरण श्रमजिवी संघटनेकडे आल्यावर जिल्हा सरचिटणीस राजेश चन्ने यांनी बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पिडीत मुलींच्या फिर्यादीवरुन गिरासे याच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान हा प्रकार संबंधीत चार मुलींसोबतच घडत होता की शाळेतील इतर मुलींसोबतही घडत होता. याचा पोलीस तपास करीत आहेत.
आश्रमशाळेतील मुलींचा अधिक्षकानेच केला विनयभंग
By admin | Updated: January 6, 2015 22:46 IST