नवी मुंबई : शहरातील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासामध्ये शिवसेनेने बाजी मारली आहे. वाशीतील ८ इमारतींच्या पुनर्विकासाच्या प्रस्तावांना पालिकेने मंजुरी दिली आहे. शनिवारी शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीमध्ये नागरिकांना संमतीपत्रांचे वाटप करण्यात आले. सेना नेत्यांनी युती सरकारने पुनर्विकासाचा प्रश्न सोडविल्याचे सांगून अगोदरच्या आघाडी सरकार व त्यांच्या नेत्यांवर टीका केली. वाशीमध्ये पुनर्विकासाच्या कामांना वेग येवू लागला आहे. शिवसेना नगरसेवक किशोर पाटकर यांच्या पाठपुराव्यानंतर ८ प्रस्तावांना महापालिकेने नुकतीच मंजुरी दिली आहे. या माध्यमातून पालिकेस जवळपास ६७ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होणार आहे. महापालिकेमध्ये राष्ट्रवादीची सत्ता असून गणेश नाईक यांचे अनेक वर्षांपासून शहरावर एकहाती वर्चस्व आहे. यानंतरही पुनर्विकासाचे पहिले प्रस्ताव शिवसेनेने मार्गी लावले आहेत. सेनेने पुनर्विकासामध्ये आघाडी घेतल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे. वाशीतील ९ इमारतींच्या पुनर्विकासाचे संमतीपत्र नागरिकांना देण्यासाठी शिवसेनेने शनिवारी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी आघाडी सरकारला १५ वर्षांमध्ये एफएसआयचा प्रश्न सोडविता आला नाही. त्यांनी फक्त निवडणुकीच्या तोंडावर आश्वासन देण्याचे काम केले. युती सरकारने तीन महिन्यांत हा प्रश्न सोडवून दाखविला आहे. अगोदरच्या सरकारने धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्यांच्या जीवाशी खेळण्याचे राजकारण केले असल्याची टीकाही त्यांनी केली. विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनीही राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका केली. यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी जनतेच्या पैशाचे राजकारण केल्याचे सांगितले. नगरसेवक किशोर पाटकर यांनीही पुनर्विकास करणाऱ्यांपुढे अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले. आम्ही दबावाला बळी न पडता जनतेच्या हितासाठी काम करणार असल्याचे स्पष्ट केले.
पुनर्विकासामध्ये सेनेची आघाडी
By admin | Updated: September 7, 2015 04:05 IST