नवी मुंबई : महापालिकेमधील पाच महत्त्वाचे अधिकारी निलंबित केल्यानंतर आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय पत्तीवार यांनाही हादरा दिला आहे. पदाला शासनाची मान्यता नसल्यामुळे त्यांना आरोग्य अधिकारी या मूळ पदावर नियुक्ती केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून महापालिका प्रशासनामध्ये साफसफाई मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत ५ मोठ्या अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. जवळपास उशिरा येणाऱ्या १८ जणांचे एक दिवसाचे वेतन थांबविले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. सोमवारी महापालिकेमधील अतिरिक्त आयुक्त डॉ.संजय पत्तीवार यांच्याकडील पदभार काढून घेण्यात आला. त्यांना आरोग्य अधिकारी या मूळ पदावर परत पाठविण्यात आले आहे. अतिरिक्त आयुक्तपदाला शासनाची मान्यता नाही. भविष्यात मान्यता मिळाल्यानंतर त्यांचा विचार केला जाईल असे स्पष्ट केले आहे. आयुक्तांच्या या निर्णयामुळे अजून किती जणांवर कारवाई होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. डॉ. संजय पत्तीवार अनेक वेळा वादग्रस्त ठरले आहेत. शिवसेना नगरसेवक एम. के. मढवी यांनी महासभा व स्थायी समितीमध्ये त्यांची नियुक्ती नियमबाह्य असल्याचे आरोप केले होते. (प्रतिनिधी)
अतिरिक्त आयुक्तांची मूळ पदावर नियुक्ती
By admin | Updated: May 31, 2016 03:22 IST