नामदेव मोरे, नवी मुंबईसुरक्षारक्षक मंडळाच्या नावाने सेबी, टाटासह महत्त्वाच्या बँकांमध्ये दलाल परस्पर सुरक्षारक्षकांची नियुक्ती करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. दलालांच्या प्रतापाची माहितीच नसल्याची भूमिका मंडळाने घेतली आहे. सुरक्षारक्षक मंडळच असुरक्षित झाले असून महत्त्वाच्या आस्थापनांच्या सुरक्षेविषयीही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुरक्षारक्षक मंडळ बृहन्मुंबई व ठाणे या मंडळाला दलालांचा विळखा पडू लागला आहे. मंडळामध्येच सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या एम. जी. मिश्रा या परप्रांतीय दलालाने ३७ मराठी मुलांना फसविले असल्याचे उघड झाले आहे. जवळपास १८लाख रुपयांना गंडा घातला आहे. सरकारी कार्यालये, बँक व इतर महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षारक्षक मंडळाकडूनच सुरक्षारक्षक घेतले जातात. खाजगी कंपन्यांना प्राधान्य दिले जात नाही. परंतु प्रत्यक्षात सरकारच्या नियंत्रणाखाली असणारी ही यंत्रणाच असुरक्षित असल्याचे स्पष्ट होवू लागले आहे. ज्या मराठी तरुणांना फसविले त्यांना मिश्राने सेबी, नानावटी रुग्णालय, टाटा कन्सल्टन्सी, युनियन बँक व इतर अनेक महत्त्वाच्या ठिकाणी नियुक्ती केली आहे. तेथील हजेरीपत्रक व पगारपत्रकावरही त्यांची नावे आहेत. अनेकांनी ओव्हरटाईम केल्याचीही नोंद केली आहे. वास्तविक सुरक्षा बोर्डाने दलालाने भरती केलेल्या सुरक्षारक्षकांची आम्हाला माहिती नसल्याचे सांगितले आहे. परंतु प्रत्यक्षात हे तरुण काम करत असलेल्या ठिकाणी मंडळाचा सुपरवायझरही कार्यरत असतो. बोर्डाने पाठविलेली व्यक्ती व प्रत्यक्षात काम करत असलेली व्यक्ती वेगळी असल्याचे पाच महिने कोणाच्याही निदर्शनास आले नसल्याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सुपरवायझर व इतर अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणाही याला कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दलालच करतात सुरक्षारक्षकांची नियुक्ती
By admin | Updated: December 22, 2015 00:37 IST