नवी मुंबई : वाहनचोरी करून पळ काढणारा चोरटा अपघातामुळे पोलिसांच्या हाती लागला आहे. त्याच्यावर एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्याकडून दोन गुन्ह्यांची उकल झाली आहे.नवीन सिंग राजपूत असे एपीएमसी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने स्वत:विषयीची अधिक माहिती अद्याप पोलिसांना सांगितलेली नाही. गुरुवारी दुपारी त्याने तुर्भे सेक्टर २४ येथून मोटरसायकल चोरी केली होती. मात्र चोरीच्या दुचाकीवरून तो धूम ठोकत असतानाच काही अंतरावर कारला त्याची धडक बसली. या अपघातात जखमी झालेला असतानाही तो पळ काढत असताना पोलिसांच्या हाती लागला. त्याला ताब्यात घेतल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र गलांडे, उपनिरीक्षक धनश्री पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सुनील तारमळे अधिक तपास करत होते. यावेळी चौकशीत त्याने तो वाहनचोर असल्याचे सांगत दोन गुन्ह्याची कबुली दिली. यानुसार दोन्ही गुन्ह्यातील चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्याने इतरही अनेक गुन्हे केल्याची शक्यता आहे. मात्र स्वत:विषयी व केलेल्या गुन्ह्यांविषयी तो अधिक माहिती देत नसल्यामुळे एपीएमसी पोलीस हतबल झाले आहेत. (प्रतिनिधी)
अपघातामुळे सापडला एपीएमसीत वाहनचोर
By admin | Updated: April 22, 2017 02:57 IST