नवी मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उपेक्षित घटकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम केले आहे. त्यांनी शोषित समाजाला न्याय देण्याबरोबरच अर्थशास्त्र, पाटबंधारे, विद्युत निर्मिती, सामाजिक समता अशा विविध क्षेत्रात मोलाचे कार्य केले असल्याचे राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. ऐरोली येथे आंबेडकर भवनच्या उद्घाटनप्रसंगी ते उपस्थित होते.पालिकेतर्फे ऐरोली येथे उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. बाबासाहेबांचे विविध क्षेत्रात मोलाचे कार्य केलेले आहे. ते अर्थतज्ज्ञ देखील होते, ही त्यांच्या जीवनाची दुसरी बाजू अद्याप योग्य प्रकारे समाजापुढे आलेली नसल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे ऐरोली येथील भव्य स्मारकात बाबासाहेबांनी भारताच्या उभारणीसाठी केलेले सर्व प्रयत्न समाजापुढे मांडावे असेही त्यांनी सुचवले. तर जगभर उलथापालथ सुरु असतानाही बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेमुळे देशातील ऐक्य टिकून असल्याचेही गौरवोद्गार त्यांनी काढले. प्रत्येक राज्यात विद्युत निर्मिती होवून ती इतरही राज्यात पुरवली जावी याकरिता वीज मंडळाची स्थापना, पाण्यासाठी धरण उभारणीचा निर्णय हे सर्व बाबासाहेबांची देण असल्याचेही ते म्हणाले. यावेळी बाबासाहेबांचे विचार आशिया खंडात पोचवणे, मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव देणे, तसेच चित्रपटाच्या माध्यमातून बाबासाहेब लोकांपर्यंत पोचवणे ही महत्त्वाची कार्ये आपल्या हातून झाल्याचे समाधान पवार यांनी व्यक्त केले. याप्रसंगी आमदार जोगेंद्र कवाडे यांनी देशाची अखंडता व एकात्मता संकटात येवू नये हे राज्यघटनेतील मूलभूत तत्त्व असल्याचे सांगितले. जगात सर्व जाती धर्माचे लोक आहेत. मात्र देशात बाबासाहेबांनी जी विचारांची इमारत उभी केली आहे, ती नष्ट करण्याचा प्रयत्न झाला तर देशावर संकट कोसळेल अशी चिंता व्यक्त केली. महापौर सुधाकर सोनावणे यांनी महापौर होताना झालेल्या आनंदापेक्षा, बाबासाहेबांचे भवन उद्घाटनाच्या आनंदाचा क्षण मोठा असल्याची भावना व्यक्त केली. या भवनला भेट देणाºयांचा जीवनाकडे बघण्याचा कल बदलेल, असेही ते म्हणाले. याप्रसंगी कार्यक्रमास माजी मंत्री गणेश नाईक, आमदार संदीप नाईक, आमदार मंदा म्हात्रे, आमदार नरेंद्र पाटील, पालिका आयुक्त रामास्वामी एन., उपमहापौर अविनाश लाड यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते.महापौर सुधाकर सोनवणे यांच्या जिवणावर आधारित परिस गवसलेला माणूस या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. लेखिका अनुपमा उजगरे यांनी हे पुस्तक लिहीलेले आहे. महापौरांचे राजकीय व सामाजिक वाटचाल या पुस्तकातून मांडण्यात आली आहे.आंबेडकर भवनासाठी निश्चित केलेल्या जागेवर मैदानाचे आरक्षण होते. त्यामुळे प्रस्तावित भवनाला अडथळा निर्माण झाला होता. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सदर मैदानाचे आरक्षण बदलून भवन उभारणीचा मार्ग मोकळा केला. परंतु भवन पूर्ण झाल्यानंतर त्याचे उद्घाटन होत असताना मात्र चव्हाण यांना निमंत्रित केले गेले नसल्याची खंत उपमहापौर अविनाश लाड यांनी भाषणातून व्यक्त केली.केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही स्मारकाला विशेष भेट दिली. यावेळी नवी मुंबई महानगरपालिकेच्या कामाचे मुक्तकंठाने कौतुक केले. बाबासाहेबांचा समतेचा आणि शांततेचा विचार जनमानसात प्रसारित करण्यासाठी हे स्मारक महत्त्वाचे ठरेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. तर बाबासाहेबांच्या विचारांचा आधार घेऊन समाज एकत्र आणण्यासाठी प्रत्येक माणसाने प्रयत्न करीत राहिले पाहिजे, असे ते म्हणाले.
शोषित समाजाला न्याय देण्याबरोबरच विविध क्षेत्रात बाबासाहेबांचे मोलाचे कार्य - शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 05:52 IST