नवी मुंबई : सत्ताधाऱ्यांच्या उदासीनतेमुळे सानपाडा येथील पालिकेच्या दोन वास्तूंची उद्घाटने रखडली आहेत. त्यापैकी एक वास्तू वर्षभरापूर्वी बांधून पूर्ण झालेली असून, त्याच्या उद्घाटनासाठी महापौरांकडून वेळ मिळत नसल्याचा आरोप लोकप्रतिनिधींकडून होत आहे. मात्र दोनही वास्तू तयार असताना उद्घाटनांअभावी त्यांचा वापर करता येत नसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.पालिकेच्या वतीने सानपाडा सेक्टर १० येथे राज्यात नावलौकिक होईल असे संवेदना उद्यान विकसित केले आहे. विशेष मुलांसह विकलांग मुले व व्यक्तींच्या सोयी-सुविधांनी संपन्न हे उद्यान आहे. तर परिसरातील सामान्य नागरिकांच्याही विरंगुळ्याचे ते प्रमुख केंद्र ठरू शकते. मात्र तीन महिन्यांपूर्वी हे उद्यान तयार होवून देखील अद्याप त्याचे उद्घाटन करण्यात आलेले नाही. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. मात्र सदर उद्यान वापरासाठी खुले करण्यास तयार असतानाही, केवळ महापौरांची वेळ मिळत नसल्याने उद्घाटन लांबणीवर जात असल्याचा स्थानिक नगरसेविका ऋ चा पाटील यांनी आरोप केला आहे. तर याच उद्यानाच्या समोर पालिकेने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृती भवन उभारले आहे. या दोन मजली भवनमध्ये तीन प्रशस्त हॉल व पार्किंगसह इतर आवश्यक सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. मात्र वर्षभरापूर्वी त्याचे काम पूर्ण झालेले असतानाही अद्याप उद्घाटन करण्यात आलेले नाही. या भवनच्या उद्घाटनासाठी देखील प्रशासनाकडून महापौरांची वेळ निश्चित होत नसल्याचे कारण पुढे केले जात आहे. परिणामी सुमारे साडेसहा कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेली ही वास्तू वापराविना धूळखात पडून आहे. याच संधीचा फायदा घेत त्याठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात तुर्भेतील विभाग कार्यालय सुरू करण्यात आले आहे. त्याकरिता पहिला व दुसरा मजला वापरला जात आहे. मागील तीन महिन्यांपासून त्याठिकाणी हे विभाग कार्यालय सुरू करण्यात आले आहे. मात्र सर्वसामान्यांच्या वापरासाठी भवन खुले करणे अपेक्षित असतानाही, ही वास्तू विभाग कार्यालयासाठी वापरली जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी सत्ताधाऱ्यांकडून पालिकेच्या विविध कामांच्या उद्घाटनांचा सपाटा सुरू होता. त्यावेळी देखील दोन्ही वास्तूचे उद्घाटन दुर्लक्षित राहिल्याचेही आश्चर्य नगरसेविका ऋ चा पाटील यांनी व्यक्त केले आहे. तर काही दिवसात दोन्ही वास्तूंचे लोकार्पण न झाल्यास ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
अण्णाभाऊ साठे भवनचे उद्घाटन रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 00:52 IST