नवी मुंबई : कळंबोली येथे चार वर्षांपूर्वी घडलेल्या विवाहितेच्या हत्येप्रकरणी तिच्या सासरच्यांना न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेवून तसेच हुंड्यासाठी छळ करुन गळा आवळून हत्या झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी मांडलेल्या सबळ पुराव्या आधारे न्यायालयाने तिघांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे.कळंबोली येथे राहणाऱ्या मधू यादव या विवाहितेची १६ एप्रिल २०१२ रोजी गळा आवळून हत्या झाली होती. याप्रकरणी तिच्या सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मयत मधूचा पती समितकुमार यादव (३२), सासरा अखिलेशकुमार (६६) व सासू सुनिता (५८) यांनी गळा आवळून तिची हत्या केली होती. त्यांच्याकडून मधूचा चारित्र्याच्या संशयावरुन छळ सुरु होता. शिवाय हुंड्यासाठी देखील तिला मानसिक त्रास दिला जात होता. मानाप्रमाणे लग्नात खर्च न केल्याचे टोमणे मारत तिला माहेरुन कार मागण्यासाठीही भाग पाडले जात होते. अखेर त्यांनी गळा आवळून तिची हत्या केली होती. याप्रकरणी मधूच्या माहेरच्यांनी सासरच्यांविरोधात तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी सासरच्यांविरोधातले सबळ पुरावे जमा करुन ते न्यायालयापुढे मांडले होते. यानुसार चार वर्षांपासून सुरू असलेल्या या खटल्यात आरोपींना शिक्षा व्हावी याकरिता उपआयुक्त विश्वास पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी जे.डी. तांबे न्यायालयात लढा देत होते. अखेर त्यांनी मांडलेल्या सबळ पुराव्याच्या आधारे न्यायालयाने तिघांनाही आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. (प्रतिनिधी)
विवाहितेच्या हत्येप्रकरणी आजन्म कारावास
By admin | Updated: July 15, 2016 01:39 IST