नवी मुंबई : महापालिकेने अतिक्रमणांवर कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. गुरुवारी ऐरोली सेक्टर ९मध्ये हॉटेल्स आणि गॅरेजमधून झालेल्या अतिरिक्त बांधकामांवर धडक कारवाई करण्यात आली. त्यामुळे अतिक्रमण करणाऱ्या या परिसरातील व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. गेल्या आठवड्यात महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या परिसरात ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमाचे आयोजन केले होते. याअंतर्गत अनेक रहिवाशांनी या परिसरातील बेकायदा बांधकामांविषयी आयुक्तांकडे तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेत गुरुवारी येथील गरम मसाला हॉटेल ते मुक्काम्बिका शोरुम्स या दरम्यानच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. या परिसरात हॉटेल्स व गॅरेजचालकांनी मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे केली होती. अनेकांनी वेदर शेडच्या नावाखाली मार्जिनल स्पेसवर अतिक्रमण केले होते. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार गुरुवारी ही सर्व बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. महापालिकेच्या ऐरोली विभाग अधिकारी तथा सह.आयुक्त तुषार पवार यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण विभागाचे नीलेश मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, येत्या काळात ही कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
ऐरोलीत अतिक्रमणांवर कारवाई
By admin | Updated: March 17, 2017 05:59 IST