नवी मुंबई : नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यास महानगरपालिका कटिबद्ध आहे. कोणत्याही स्थितीमध्ये गुणवत्तेशी तडजोड करू नये. गुणवत्ता ढासळल्यास अधिकारी असो किंवा कंत्राटदार कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा आयुक्त अभिजीत बांगर यांनी अभियांत्रिकी विभागास दिला आहे.मनपा मुख्यालयात अभियांत्रिकी विभागाची आढावा बैठक घेण्यात आली होती. या बैठकीमध्ये आयुक्तांनी शहर अभियंता सुरेंद्र पाटील व इतर अधिकाऱ्यांकडून रस्ते, स्थापत्यविषयक कामे, विद्युत, पाणीपुरवठा, मलनिस्सारणसह सर्व कामांची माहिती घेतली. इतर शहरांच्या तुलनेमध्ये नवी मुंबईमध्ये खड्डे कमी आहेत, परंतु खड्डे पडणारच नाहीत, यासाठी काळजी घेतली पाहिजे. खड्डे तत्काळ दुरुस्त झाले पाहिजेत. नागरिकांनी केलेल्या तक्रारींचे २४ ते ४८ तासांमध्ये निराकरण झाले पाहिजे. पावसाचे प्रमाण कमी झाले असल्यामुळे पुढील आठवड्यात शहरात एकही खड्डा दिसणार नाही, याची काळजी घ्या, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. सर्व कामे वेळेत पूर्ण झाली पाहिजेत. निविदा प्रक्रिया योग्य पद्धतीने राबविणे आवश्यक आहे. कामे बाजारभावापेक्षा कमी दराने गेली पाहिजेत. गुणवत्तेशी कोणत्याही स्थितीमध्ये तडजोड होता कामा नये. गुणवत्ता ढासळली, तर संबंधितांवर कारवाई होणार आहे.अभियंत्यांनी विनाकारण मुख्यालयात थांबू नये. कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता यांनी फिल्डवर असणे अत्यंत आवश्यक आहे. आपण नागरिकांशी बांधिल असून, नागरिकांसाठी जास्तीतजास्त उपलब्ध असले पाहिजे. दाखल तक्रारींचे तत्परतेने निराकरण झाले पाहिजे, अशा सूचनाही दिल्या आहेत. शहर अभियंता व कार्यकारी अभियंत्यांनी दक्ष राहावे व सर्व सहकारी अधिकारी कर्मचाºयांसह ठेकेदारासही दक्ष राहण्यास सांगावे, अशा सूचनाही बैठकीमध्ये देण्यात आल्या.
गुणवत्ता ढासळल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई; आयुक्तांनी दिला इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 00:39 IST