नवी मुंबई : शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाच्या देखभालीसाठी वर्षाला ७३ कोटी ९८ लाख रुपये खर्च होत आहे. देखभालीच्या प्रस्तावास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. नवी मुंबई महापालिकेने शहरवासीयांना मुबलक पाणीपुरवठा करता यावा यासाठी मोरबे धरण विकत घेतले आहे. या धरणाची स्थापत्य, यांत्रिकी, विद्युतविषयी कामे करण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात येते. दुरुस्तीसह स्वच्छता, डागडुजी, साफसफाई, रंगकाम करणे, सेवाद्वारे वक्राकार दरवाजे तसेच धरण स्थळी असलेला डी. जी. सेट कार्यान्वित करणे, धरण परिसरातील पाच गावांना पाणीपुरवठा करणे, त्यासाठीचे कर्मचारी, आवश्यक रसायने व इतर पुरविण्याची जबाबदारी ठेकेदारावर असते. धरणावर दोन सर्व्हिस गेट, रेडियल गेट, आजूबाजूचे स्ट्रक्चर, पोहच पुल यांना रंग लावणे. धरण प्रकल्पावरील ६ किलोमीटर लांबीच्या रस्त्याची देखभाल, पथदिव्यांची दुरुस्ती, गस्त घालण्यासाठी चारचाकी वाहने पुरवावी लागतात. गतवर्षी या कामांसाठी पालिकेने ठेकेदार नियुक्त केला आहे. या कामासाठी वर्षाला ७३ लाख ९८ हजार रुपये खर्च होत असून संबंधित ठेकेदारास दुसऱ्या वर्षासाठी मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव मंगळवारी स्थायी समितीने मंजूर केला.
मोरबे धरणाच्या देखभालीसाठी ७३ लाख !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2015 01:41 IST