नवी मुंबई : संत निरंकारी समागम मंडळाने पोलीस बंदोबस्ताचे ६५ लाखांचे बिल थकवल्याची बाब उघड झाली आहे. गतवर्षी खारघर येथेच समागमाचा कार्यक्रम झाला असता तेथे सुमारे २५० पोलिसांचा बंदोबस्त पुरवण्यात आलेला. मात्र या बंदोबस्ताचे बिल भरण्यास समागम मंडळाकडून नकार दिला जात आहे.२३ जानेवारीपासून खारघर येथे संत निरंकारी समागम मंडळाच्या कार्यक्रमास सुरवात होत आहे. या दरम्यान लाखोंच्या संख्येने भक्त उपस्थित राहतील. गतवर्षी देखील खारघरच्या याच ठिकाणी समागमाचा कार्यक्रम झाला. त्याकरिता सुरक्षेच्या अनुषंगाने पोलिसांनी चोख बंदोबस्त पुरवला होता. मात्र समागम संपल्यानंतर या सुरक्षा व्यवस्थेचे ६५ लाख रुपयांचे बिल पोलिसांनी समागम मंडळाला दिले. परंतु सुरक्षेचे बिल अद्याप समागम मंडळाकडून भरण्यात आलेले नाही. अशातच दोन दिवसांपासून पुन्हा तेथे समागमाचा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे सुरक्षेच्या बिलाची जुनी थकबाकी असतानाही पुन्हा सुरक्षा पुरवण्याचा पेचाचा प्रसंग नवी मुंबई पोलिसांपुढे निर्माण झाला आहे. गतवर्षीच्या बंदोबस्ताचे बिल पाठवूनही त्याचा भरणा करण्यासंदर्भात समागम मंडळाने पोलिसांना प्रतिसाद दिला नाही. तर आपण सुरक्षा मागितलेली नसल्याने बिलही भरणार नसल्याचे मंडळाकडून पोलिसांना सांगितले जात आहे. यासंदर्भात समागमचे समन्वयक शंभूनाथ तिवारी यांच्याशी संपर्क साधला असता तो झाला नाही. मात्र गतवर्षाची थकबाकी असतानाही नागरी सुरक्षेखातर यंदाही पोलीस बंदोबस्त पुरवण्याची भूमिका नवी मुंबई पोलिसांनी घेतली आहे. त्याकरिता २५० पोलीस कर्मचारी व ४० अधिकारी तेथे कार्यरत केले जाणार आहेत. (प्रतिनिधी)गतवर्षी खारघर येथे समागमचा कार्यक्रम झाला असता पोलीस बंदोबस्त पुरवण्यात आला होता. त्याचे ६५ लाख रुपयांचे बिल अद्याप समागम मंडळाने भरलेले नाही. या बिलासंदर्भात संपर्क साधूनही मंडळाकडून योग्य प्रतिसाद मिळत नाही.- शेषराव सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस आयुक्त.
निरंकारी समागमने थकवले पोलिसांचे ६५ लाख
By admin | Updated: January 22, 2015 01:15 IST