कळंबोली : कामोठे येथे सुरू असलेल्या जत्रेत अचानक आकाशपाळणा बंद पडला. त्यामुळे जवळपास ६२ लोक त्यात अडकून पडले. शनिवारी रात्री ही घडल्यानंतर अग्निशमन पथकातील जवानांनी त्यांची सुटका केली. सेक्टर-११ येथील मोकळ्या जागेवर जत्रा भरविण्यात आली आहे. याकरिता सिडको आणि पोलिसांकडून कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. रात्री आठच्या सुमारास आकाशपाळणा बंद पडला. बरेच प्रयत्न करूनही तो सुरू न झाल्याने त्यात बसलेले नागरिक तसेच जत्रेसाठी आलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. त्यानंतर कळंबोली येथून अग्निशमन दलाच्या पथकाला बोलविण्यात आले. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आकाशपाळण्यातील लोकांना खाली उतरविण्यात यश आले. या संदर्भात संबंधित आयोजकांनी परवानगीकरिता अर्ज केला होता. मात्र अद्याप परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकाशपाळणा बंद पाडल्याने ६२ जण अडकले
By admin | Updated: September 29, 2015 00:46 IST