उरण : बोकडवीरा येथील जीटीपीएस प्रकल्पात नाशिकहून ज्युनिअर इंजिनिअर म्हणून ट्रेनिंगसाठी आलेल्या 22 जणांवर आग्या माशांनी आकस्मिक हल्ला चढविला. या आकस्मिक हल्ल्यात 22 इंजिनिअर्स जखमी झाले आहेत. यामध्ये एक एक्झुक्युटिव्ह इंजिनिअर्ससह 8 महिला प्रशिक्षणार्थीचा समावेश आहे. त्यांना उपचारार्थ येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तातडीच्या उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर असून सर्वावरील धोका टळला असल्याची माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक मनोज भद्रे यांनी दिली.
उरण तालुक्यातील बोकडवारा येथे जीटीपीएम वीजनिर्मिती प्रकल्प आहे. या प्रकल्पात नाशिकहून प्रशिणार्थी 28 ज्युनिअर्स इंजिनिअर्स प्रशिक्षणासाठी आले आहेत. शनिवार (11) प्रशिक्षणार्थी बॉयलर प्लाण्टवर पाहणीसाठी चालले असता 5क् फूट उंचीवर असलेल्या आग्या माशांच्या मोहोळावरील हजारो माशांनी प्रशिक्षणार्थीवर हल्ला केला.
या आग्या माशांच्या हल्ल्यात 22 प्रशिणार्थी जबर जखमी झाले. माशांच्या हल्ल्यानंतर जखमी झालेल्या 22 प्रशिणार्थीना येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांना 24 तास वैद्यकीय अधिका:यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. तातडीच्या उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर असून सर्वावरील धोका टळला असल्याची माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक मनोज भद्रे यांनी दिली.
माशांच्या हल्ल्यात प्रशिक्षणार्थी जखमी झाल्याचे वृत्त येताच परिसरात मोठी खळबळ उडाली. तसेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. (वार्ताहर)