ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ४ - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुस्त झालेल्या प्रशासकीय यंत्रणेला आता कामाला लावण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. मोदींनी केंद्रीय कर्मचा-यांचे कामाचे तास वाढवण्यासोबतच आता सहा दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेतला असून लवकरच हा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पर्सनल अँड ट्रेनिंग विभाग स्वतःकडेच ठेवला असून या विभागाला मोदींनी मंत्रिमंडळासमोर एक प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी मोदी मंगळवारी विभागाच्या अधिका-यांसोबत चर्चाही करणार होते. मात्र गोपीनाथ मुंडेच्या निधनाने ही बैठक रद्द करण्यात आली. आता यासंदर्भातील पुढील बैठक कधी होईल हे अद्याप समजू शकलेले नाही.
प्रशासकीय यंत्रणेला कामाला लावून सरकारी निर्णाची प्रक्रिया वेगवान करण्याचा मोदींचा प्रयत्न आहे. यासाठी मोदींनी केंद्रीय कर्मचारी व अधिका-यांचे कामाच्या तासात एक तासाने वाढ करणार असून कामाचे दिवस सोमवार ते शनिवारपर्यंत करण्यात येतील. सध्या केंद्रीय कर्मचा-यांसाठी सोमवार ते शुक्रवार असा पाच दिवसांचाच आठवडा आहे. त्यामुळे मोदींनी हा प्रस्ताव मार्गी लावल्यास केंद्रीय कर्मचा-यांसाठी काम करने के दिन आ गये अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य व्यक्त करत आहे.
मोदी स्वतःदेखील दररोज सुमारे १८ तास काम करत असून त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनादेखील जास्तीत जास्त वेळ काम करायला लावले जात आहे. मोदींनी असाच प्रयोग गुजरातमध्येही केला होता. विशेष म्हणजे हा प्रयोग गुजरातमध्ये कमालीचा यशस्वी ठरला होता.
मोदींच्या प्रस्तावातील प्रमुख मुद्दे
> आठवड्यात फक्त रविवारी सुट्टी द्यायला हवी. शनिवारीदेखील सर्व मंत्रालय व विभाग सुरु असावेत.
> कार्यालयीन कामकाजाची वेळ सकाळी ८ ते संध्याकाळी ६ पर्यंत असावी. यात दोन तास जेवणासाठी ब्रेक द्यावा. त्यामुळे कर्मचा-यांना पुरेशी विश्रांती मिळेल.
> कर्मचा-यांच्या पगारातील काही हिस्सा हा त्यांच्या कामावर आधारित असावा. त्यामुऴे कॉर्पोरेटप्रमाणेच कर्मचा-यांच्या कामाचे मुल्यांकन होऊ शकेल. तसेच कर्मचा-यांमध्ये स्पर्धा निर्माण होऊन कामकाजाचा दर्जा सुधारेल.