ऑनलाइन लोकमत
तिरुअनंतपुरम, दि. ३ - स्त्रियांनी जीन्स घालणे हे भारतीय संस्कृतीविरोधात असल्याचे वादग्रस्त वक्तव्य ज्येष्ठ गायक येसूदास यांनी केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. गांधी जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
'साधेपणा व मनमिळाऊ वृत्ती ही स्त्रीचे सर्वोच्च गुण मानले जातात. स्त्रियांनी जीन्स घालणे हे भारतीय संस्कृतीत बसत नाही, त्यामुळे जीन्स घालून महिलांनी इतरांना त्रास देऊ नये, असे ते म्हणाले.
दरम्यान येसूदास यांच्या या विधानावर सर्व स्तरांतून नाराजी व्यक्त होत आहे. त्यांच्या वक्तव्याच्य निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या महिला शाखेने मोर्चा काढत आपली नाराजी दर्शवली. 'येसूदास यांचे हे वक्तव्य अमान्य असून हे वक्तव्य महिलांच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण आहे,' अशी प्रतिक्रिया महिला काँग्रेसच्या नेत्या बिंदु कृष्णन यांनी व्यक्त केली. 'येसूदास हे ज्येष्ठ गायक असून संगीतक्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा आम्हाला अभिमान आहे. मात्र त्यांनी केलेले हे वक्तव्य अतिशय दुर्दैवी आहे,' असेही त्या पुढे म्हणाल्या.