मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक. तिथे सध्या नमामी यात्रा सुरू असल्याने भाविकांची चांगलीच गर्दी होत आहे. पण तेथील रस्त्यांवरून जाताना एक सुंदर तरुणी सर्वांचं लक्ष वेधून घेते. लोक वळून तिच्याकडे पाहत असतात. ती तेथील रस्ते स्वच्छ करीत असते. ती स्वच्छ भारत मोहिमेची अॅम्बेसडर असावी, असे कोणाला वाटते, तर कोणत्या तरी चित्रपटाचं चित्रिकरण तिथे सुरू आहे की काय, असं काही जण शोधक नजरें पाहत असतात. ती रस्तेसफाई करीत असल्याची छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि मग सर्वांचंच तिच्याकडे लक्ष गेलं. अंगावर सुंदर साडी, ओठांना लिपस्टीक, चेहऱ्यावर नीट मेकअप केलेला आणि हातात झाडू अशी छायाचित्रं पाहून सारेच हैराण झाले. पण नंतर कळलं की ती खरोखरच सफाई कर्मचारी आहे. बबली तिचं नाव. तिचं शिक्षण कमी झालंय, त्यामुळे तिच्या नशिबी हे काम आलं आहे. तिचे वडील सुनील नील हेही सफाई कर्मचारी आहेत. आपण फारसं शिकलो नसलो तरी आपण स्वत: स्वच्छ आणि नीटनेटकं राहायला हवं आणि आपलं शहरही स्वच्छ ठेवायला हवं, असं बबली सांगते. भारतातील स्वच्छ शहरांमध्ये ओंकारेश्वरचा ३६ वा क्रमांक आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. पण आम्हाला शहर आणखी स्वच्छ ठेवून पुढील क्रमांक पटकावायचा आहे. त्यामुळे रोज मी आंघोळ व मेकअप करून तसंच नीट कपडे नेसून सफाईचं काम सुरू करते, असं ती म्हणते. ओंकारेश्वर नगर परिषदेच्या सफाई खात्यात ती रोजंदारीवर काम करते. मी सफाई करत असताना अनेक जण माझ्याकडे पाहून थांबतात, माझी चौकशी करतात. माझी छायाचित्रं काढता, काही जण सेल्फीही काढतात. त्यामुळे माझा आत्मविश्वास अधिक वाढतो, असं बबलीचं म्हणणं आहे.
कोण आहे ही सुंदर तरुणी?
By admin | Updated: June 8, 2017 00:32 IST