ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. ७ - रासलीला करताना पकडलेल्या एका तरुणाला पोलिसांनी तुरुंगाऐवजी थेट बोहल्यावर चढवत त्या मुलीसोबत मुलाचे लग्न लावून दिल्याची घटना उत्तरप्रदेशमध्ये घडली आहे. पोलिस ठाण्यातच झालेला हा विवाहसोहळा सध्या चर्चेचा विषय ठरला असून लग्न झाल्यावर आज मेरे यार की शादी है या गाण्यावर पोलिसही थिरकल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
उत्तरप्रदेशमधील संभल पोलिस ठाण्याअंतर्गत सराय सैफ खान विभाग येतो. या विभागात राहणारा एक मुलगा त्याच्या प्रेयसीच्या घरी आपत्तीजनक स्थितीत पकडला गेला. मुलीच्या नातेवाईकांनी त्या तरुणाविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली. या सर्व प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणाला पोलिसांनीच एक पर्याय सुचवला. पोलिसांनी त्या तरुणाला संबंधीत मुलीशी लग्न करण्याचा सल्ला दिला. तिच्याशी लग्न केले नाही तर बलात्काराच्या आरोपाखाली आयुष्यभर तुरुंगात राहावे लागेल असे पोलिसांनी त्याला सांगितले. अखेरीस काहीशा घाबरलेल्या अवस्थेतच तो तरुण लग्नाला तयार झाला. त्याने होकार देताच पोलिसांनी थेट लग्नाची तयारी सुरु केली. निकाह लावण्यासाठी काझी यांना पोलिस ठाण्यातच बोलवून घेतले. व-हाडी म्हणून काही पोलिस वरासोबत आले. धुमधडाक्यातच हा छोटेखानी विवाहसोहळा पार पडला. लग्नानंतर पोलिसांनी दाम्पत्त्यासोबत सेल्फीही काढली. संभलमधील वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी या कृतीचे समर्थनच केले. तरुण आणि तरुणीच्या कुटुंबाचे हित बघूनच आम्ही हे लग्न लावून दिले असा बचावही पोलिसांनी केला.