वन्यप्राण्यांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती
By admin | Updated: April 26, 2016 00:16 IST
नागपूर : सूर्य आग ओकू लागताच सर्वत्र पाणीटंचाईची समस्या भेडसावू लागली आहे. यात नागरिकांसोबतच जंगलातील
वन्यप्राण्यांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती
नागपूर : सूर्य आग ओकू लागताच सर्वत्र पाणीटंचाईची समस्या भेडसावू लागली आहे. यात नागरिकांसोबतच जंगलातील वन्यप्राण्यांनाही पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यात अनेक वन्यप्राणी पाण्याच्या शोधात शहरापर्यंत पोहोचत आहेत. अशाच मागील आठवड्यात शहरातील एका भागात शिरलेल्या एका हरणावर बेवारस कुत्र्यांनी हल्ला चढवून त्याला ठार केल्याची घटना पुढे आली आहे.विशेष म्हणजे, वन्यजीव विभागाच्या अधिकारक्षेत्रातील पेंच, उमरेड-कऱ्हांडला, बोर व मानसिंगदेव अभयारण्यात वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्याची बऱ्यापैकी व्यवस्था करण्यात आली आहे. जंगलात ठिकठिकाणी पाणवठे तयार करून बोअरवेलसुद्धा खोदण्यात आल्या आहेत. मात्र त्याचवेळी प्रादेशिक विभागांतर्गत येणाऱ्या वनक्षेत्रात फारच बिकट परिस्थिती आहे. त्यामुळे याच वनक्षेत्रातील अधिकाधिक वन्यप्राण्यांना दरवर्षीच्या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचा अनुभव राहिला आहे. वन्यजीव विभागासोबतच या प्रादेशिक विभागाच्या अधिकारातील वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांचा अधिवास आहे. मात्र असे असताना या वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेकडे दुर्लक्ष केल्या जाते.