वासनकरांच्या लाभार्थ्यांना गुन्हे शाखेचा अल्टीमेटम -१
By admin | Updated: August 31, 2015 21:43 IST
तातडीने रक्कम जमा करा : अन्यथा जप्तीची कारवाई :
वासनकरांच्या लाभार्थ्यांना गुन्हे शाखेचा अल्टीमेटम -१
तातडीने रक्कम जमा करा : अन्यथा जप्तीची कारवाई : नागपूर : महाठग प्रशांत वासनकरकडून १० कोटी ९० लाखांची रोकड स्वत:च्या खात्यात वळती करून घेणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेने ही रक्कम पोलिसांकडे जमा करण्यासाठी अल्टीमेटम दिल्याची माहिती आहे. दोन आठवड्यांच्या आत ही रक्कम जमा झाली नाही तर तुमची मालमत्ता जप्त करू, असा इशाराही पोलिसांनी अविनाश भुते, पंकज राठी आणि संतदास चावला या तिघांना दिल्याचे सांगितले जाते. आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून हजारो ठेवीदारांचे शेकडो कोटी गिळंकृत करणाऱ्या प्रशांत वासनकरने आपले नातेवाईक, मित्रमंडळी आणि एजंटच्या माध्यमातून या रकमेची पद्धतशीर विल्हेवाट लावली आहे. ताजश्री समूहाचे अविनाश भुते यांच्या खात्यात वासनकरकडून ९ कोटी ५० लाख रुपये जमा झाले. बिल्डर संतदास चावलांकडे ५० लाख रुपये तर व्यापारी पंकज राठींच्या खात्यात ९० लाख रुपये वासनकर समूहाकडून वळते झाले. पोलीस तपासात ही बाब उघड झाल्यामुळे वासनकरच्या गोरखधंद्यात या तिघांचाही सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्याचमुळे भुते यांच्या निवासस्थानासह त्यांच्या ताजश्री समूहाशी संबंधित ८ ठिकाणी तसेच चावला व राठीच्या निवास आणि कार्यालयासह एकूण १२ ठिकाणांवर शनिवारी एकाच वेळी गुन्हे शाखेने धाडी घातल्या. तपासणीनंतर या सर्वच ठिकाणांहून कोट्यवधींच्या व्यवहाराची कागदपत्रे तसेच भुते यांच्याकडून ९ लाख २५ हजार रुपये आणि चावलांकडून १ लाख ७५ हजार अशी ११ लाखांची रोकड पोलिसांनी जप्त केली. -जोड आहे...