कोलकाता : रेल्वेचे ‘कन्फर्म्ड’ तिकीट मिळाले नसेल तर आता ‘तिकीट जुगाड’ नामक एक मोबाईल अॅप तुमच्या मदतीला येऊ शकते. महाराष्ट्राच्या औरंगाबादचा रुणाल जाजू आणि त्याचा मावसभाऊ शुभम बलदावा अशा दोघांनी मिळून ही अॅप तयार केली आहे. रुणाल हा आयआयटी खडगपूरचा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे, तर शुभम हा जमशेदपूर एनआयटीचा विद्यार्थी आहे. महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे राहणाऱ्या रुणालला नेहमी औरंगाबाद ते खडगपूर असा प्रवास करावा लागतो. मात्र या प्रवासाचे ‘कन्फर्म्ड’ तिकीट मिळवताना सर्वांच्या वाट्याला येणारा त्रास त्याच्याही वाट्याला यायचा. यातूनच त्याने ‘कन्फर्म्ड’ तिकीट मिळवून देण्यास मदतगार ठरू शकेल, असे अॅप बनवण्याचा विचार केला आणि ही कल्पना सत्यात उतरवली. काही तिकीट एजंट कुठल्याही अॅपच्या मदतीशिवाय स्वत: अशाचप्रकारे आधीच्या वा नंतरच्या रेल्वे स्थानकांचा शोध घेऊन कन्फर्म्ड तिकीट उपलब्ध करून देतात. मात्र यासाठी प्रवाशांना मोठी रक्कम मोजावी लागते. ‘तिकीट जुगाड’ मात्र मोफत डाऊनलोड करता येऊ शकते; शिवाय सेवेसाठी त्यावर कुठलेही शुल्क आकारले जात नाही.
कन्फर्म्ड तिकिटासाठी ‘जुगाड’ वापरा !
By admin | Updated: February 15, 2016 03:46 IST