नवी दिल्ली - मोदींना अच्छा दोस्त म्हटले म्हणून पक्षातून काढले चेन्नई : भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे जयललिता यांचे चांगले मित्र आहेत, असे विधान केल्याबद्दल अण्णाद्रमुकचे नेते व राज्यसभेचे माजी सदस्य मलयसामी यांना पक्षाच्या सुप्रीमो जयललिता यांनी पक्षातून बाहेर काढले आहे. पक्षाच्या शिस्तीचा भंग करणे व पक्षाच्या प्रतिमेला धक्का लावण्याकरिता मलयसामी यांचे पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. मोदी हे तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे चांगले मित्र असल्याचे विधान मलयसामी यांनी केले होते. निवडणुकांच्या निकालानंतर अण्णाद्रमुक मोदी सरकारात महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचेही ते पुढे म्हणाले होते. राजनाथ यांची सुरेश सोनींसोबत भेट नवी दिल्ली : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांनी रा.स्व. संघाचे नेते सुरेश सोनी यांची गुरुवारी भेट घेतली. आगामी सरकारच्या स्थापनेबाबत विचार करून, आपल्या संघटनेत बरेच फेरबदल करण्यावर पक्ष विचार करीत असल्याचे सांगितले जाते. याच पार्श्वभूमीवर राजनाथ व सोनी यांच्या संघटनेतील बदलासोबतच सध्याच्या राजकीय वातावरणावर चर्चा सुरू झाली. भाजपाने याआधीच आपले दरवाजे कोणत्याही पक्षासाठी खुले असल्याचे जाहीर केले आहे. राजनाथसिंह यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत अनेक भाजपा नेते सहभागी झाले होते. ही बैठक सिंह यांच्या मोदींसोबत झालेल्या भेटीनंतर आयोजित करण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजनाथ यांना मंत्रिपद दिल्यानंतर पुन्हा गडकरी यांच्या नावाचा विचार सुरू असल्याचे कळते. ममतांकडे देशाचे नेतृत्व द्यावे - अल्वी नवी दिल्ली : भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकजूट केली पाहिजे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची आपला नेता म्हणून एकमताने निवड केली पाहिजे, असा सल्ला काँग्रेसचे नेते राशीद अल्वी यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या एक दिवसाआधी दिला आहे. काँग्रेससाठी केंद्रात सरकार स्थापन करणे कठीण होऊ शकते, असे मान्य करून अल्वी म्हणाले, ‘सरकार स्थापन करणे आमच्यासाठी कठीण होऊ शकते. परंतु, मोदी यांना सत्ता काबीज करण्यापासून रोखण्यासाठी सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी आता एकत्र आलेच पाहिजे. टीआरएसला पर्याय खुले हैदराबाद : निवडणूकपूर्व सर्वेक्षणाचे निकाल मोदींच्या पाठीशी असले तरी, टीआरएसने काँग्रेसप्रणीत संपुआलाच आपला पाठिंबा देण्यास प्राधान्य राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. टीआरएसचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांची कन्या व पक्षाची नेता कविता यांनीही रालोआ सरकारला पाठिंबा देण्याची कुठलीच शक्यता नसल्याचे सांगितले. मोदी पाच लाखांनी जिंकतील - पटेल वडोदरा : गुजरातचे ऊर्जामंत्री सौरभ पटेल यांनी वडोदरा येथील लोकसभेच्या जागेवरून नरेंद्र मोदी हे पाच लाखांच्या मताधिक्क्याने निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. मोदींच्या पाठीशी फार मोठी मतसंख्या राहणार असून, त्यांना पाच लाखांच्या फरकांनी विजय मिळेल, असे मत त्यांनी मांडले आहे.
अस्वस्थ, वेगवान राजकारण!
By admin | Updated: May 16, 2014 03:51 IST