हरीश गुप्ता, नवी दिल्लीअनेक आघाड्यांवर संकटाचा सामना करीत असलेल्या काँग्रेसश्रेष्ठींसमोर आणखी एक प्रश्न समोर ठाकला आहे़ राज्यसभेच्या दोन जागांसाठी कुणाला उमेदवारी द्यायची, यावर सध्या काँगे्रसमध्ये खल सुरू आहे़उत्तराखंडची एक आणि उत्तर प्रदेशातील एक अशा राज्यसभेच्या दोन जागा काँगे्रसच्या पदरात पडू शकतात़ या दोन जागांसाठी काँग्रेसमधील दिग्गजांनी प्रचंड ‘लॉबिंग’ चालवले आहे़ गत मे महिन्यातील लोकसभा निवडणुकीत पराभवाचे तोंड पाहावे लागलेले नेतेही यात मागे नाहीत़ अलीकडे सत्तेतून बेदखल झालेले दोन माजी मुख्यमंत्रीही या दोन जागांवर डोळा ठेवून आहेत़ मात्र पक्षश्रेष्ठींसमोरची मुख्य समस्या ही राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद हे आहेत़ आझाद यांचा कार्यकाळ पुढीलवर्षी मार्चमध्ये संपत आहे़ त्यांना उत्तराखंड वा उत्तर प्रदेशात राज्यसभेची उमेदवारी न दिल्यास पक्षाला राज्यसभेत नवा विरोधी पक्षनेता शोधावा लागणार आहे़ अशी स्थिती उद्भवल्यास राज्यसभेतील काँग्रेसचे उपनेते आनंद शर्मा यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची सूत्रे सोपवली जावी, असा पर्याय पक्षापुढे आहे़ याशिवाय पक्षाचे सरचिटणीस आणि राज्यसभा खासदार दिग्विजयसिंग यांच्या रूपातील आणखी पर्याय काँग्रेसपुढे आहे़माजी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद, माजी दूरसंचारमंत्री कपिल सिब्बल, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री विजय बहुगुणा, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित, जतीन प्रसाद, आरपीएन सिंग हे राहुल गांधी यांचे दोन निकटस्थ हेही राज्यसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत़ उत्तर प्रदेशात समाजवादी प्रमुख मुलायमसिंग यादव यांनी कपिल सिब्बल यांना राज्यसभेवर पोहोचविण्यासाठी अतिरिक्त मते देण्याचा प्रस्ताव काँग्रेसपुढे ठेवला आहे़ उत्तर प्रदेश विधानसभेत काँग्रेसकडे २८ मते आहेत़ जिंकण्यासाठी काँग्रेसला ४१ मतांची गरज आहे़ सपाच्या अतिरिक्त मतांचा यात महत्त्वाचा वाटा राहणार आहे़ राज्यसभेच्या दहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत समाजवादी पक्षाच्या सहा उमेदवारांचा विजय निश्चित आहे़ सदस्य संख्येच्या आधारावर बसपाच्या वाट्याला दोन आणि काँग्रेस तसेच भाजपाच्या वाट्याला प्रत्येकी एक जागा येणार आहे़सपाच्या मदतीने काँगे्रस ही एक जागा जिंकू शकते़ अर्थात अद्याप काँग्रेसने याबाबत कुठलेही संकेत दिलेले नाहीत़उत्तराखंडात भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री भगतसिंह कोश्यारी लोकसभेवर निवडून गेल्यामुळे त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता़ त्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे़ माजी मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांनी या जागेच्या तिकिटासाठी जोरदार लॉबिंग चालवली आहे़मात्र मुख्यमंत्री हरीश रावत यांच्या प्रखर विरोधामुळे बहुगुणा यांना ते मिळण्याची शक्यता क्षीण मानली जात आहे़ ७० सदस्यीय राज्य विधानसभेतील संख्याबळाच्या आधारावर या जागेवर काँग्रेस उमेदवाराचा विजय निश्चित मानला जात आहे़
राज्यसभेच्या दोन जागांवरुन काँग्रेसमध्ये खल
By admin | Updated: November 4, 2014 04:11 IST