भरधाव मोटारीने उडविल्याने दोन विद्यार्थिनी ठार
By admin | Updated: March 16, 2015 22:48 IST
एक गंभीर : बावळण महामार्गावरील ताथवडे येथील घटना
भरधाव मोटारीने उडविल्याने दोन विद्यार्थिनी ठार
एक गंभीर : बावळण महामार्गावरील ताथवडे येथील घटना (आधीच्या बातमीत एक ठार असे होते...)वाकड : रस्ता ओलांडत असलेल्या तीन विद्यार्थिनींना भरधाव मोटारीने जोरदार धडक दिली. या अपघातात दोन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला, तर त्यांची एक मैत्रीण गंभीर जखमी असून, तिची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास मुंबई-बंगळुरुबावळण महामार्गावरील ताथवडे येथील इंदिरा महाविद्यालयासमोर घडली. रिद्धी प्रमोदभाई पटेल (वय २०) व हर्षिता दीपक गीते (वय २०) या दोघींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर हेमाद्री पटेल (वय २०, सर्व रा. सिमरन हॉस्टेल, भूमकरवस्ती, वाकड) हिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मूळच्या गुजरातच्या असलेल्या या विद्यार्थिनी ताथवडे येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयात बी-टेक आणि एम-टेकच्या तृतीय वर्षाला शिकत होत्या.याप्रकरणी मोटारचालक चालक संतोष शांताराम देवकर (वय ३०, रा. येरवडा, पुणे) याच्यावर हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सहायक निरीक्षक महेंद्र कदम यांनी दिलेली माहिती अशी : या तिघी मैत्रिणी सकाळी नऊच्या सुमारास भूमकरवस्तीकडून शनि मंदिरमार्गे सेवा रस्त्यावरून महाविद्यालयाकडे निघाल्या होत्या. महामार्ग ओलांडून त्या पलीकडे जात होत्या. त्याच वेळी मुंबईकडून-कात्रजच्या दिशेला भरधाव जाणार्या मोटारीने येथील भुयारी पुलाच्या कठड्याला जोरदार धडक दिली. त्यामध्ये मोटारीचा टायर फुटल्याने भरकटलेल्या मोटारीने या तिघींना उडविले. ही धडक इतकी भीषण होती की, रिद्धी दहा फूट उंच उडून पुलाच्या कठड्यावरून खाली पडली. हिमाद्री मोटारीच्या समोर, तर हर्षिता मोटारीसह काही अंतरापर्यंत फरपटत पुढे गेली. घटनेनंतर जमलेले विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक रुग्णवाहिका आणि पोलिसांना फोन करीत होते. मात्र, अर्धा तास उलटूनही घटनास्थळी यापैकी कोणीही पोहोचले नाहीत. एवढेच नव्हे, तर रस्त्यावरील प्रत्येक मोटारीला हात करून रुग्णालयात नेण्याची विनंती केली जात होती. मात्र, मोबाईलमध्ये फोटो काढण्याखेरीज कोणीही मदतीसाठी पुढे येत नव्हते. अखेर या रस्त्याने जाणारे प्राध्यापक डॉ. साजिद अल्वी यांनी दोघींना त्यांच्या मोटारीतून रुग्णालयात नेले, तर एकीला विद्यार्थ्याच्या वाहनातून हलविण्यात आले. सर्व जखमींना रुग्णालयात हलविल्यानंतर तब्बल तासाभराने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ----