बीजिंग : ब्रिटनमधील एडिन्बर्ग विद्यापीठात सन १९९६मध्ये ज्या क्लोनिंग तंत्रज्ञानाने ‘डॉली’ ही पहिली मेंढी जन्माला आली, त्याच तंत्रज्ञानाच्या अधिक प्रगत स्वरूपाचा वापर करून माकडांची दोन पिल्ले जन्माला घालण्यात चीनधील वैज्ञानिकांना यश आले आहे.जैवविज्ञान शास्त्रानुसार मानवास अगदी जवळचे असे माकड, लैंगिक समागमाखेरीज जन्माला घातल्याने, कालांतराने याच तंत्रज्ञानाने मानवही जन्माला घालणे सैद्धांतिकदृष्ट्या शक्य असले तरी तसे न करता याचा वापर मानवाला होणाºया अनेक असाध्य रोगांवरील उपचारांच्या संशोधनापुरता मर्यादित ठेवण्याचे नैतिक बंधन पाळण्याचे जगभरातील वैज्ञानिकांनी मान्य केले आहे.लांब शेपटीच्या ‘मकाकस’ प्रजातीच्या माकडाची ही दोन पिल्ले चीनच्या विज्ञान प्रबोधिनीच्या शांघाय येथील ‘इन्स्टिट्यूट आॅफ न्यूरोसायन्स’मध्ये जन्माला घातली. त्यांनी ‘हुआ हुआ’ आणि ‘झाँग झाँग’ अशी नावे दिली असून, ती आता सहा व आठ आठवड्यांची झाली आहेत.संशोधनासाठी वरदान-मानवाच्या अनेक असाध्य रोगांवरील उपचारांच्या संशोधनासाठी औषध प्रयोगशाळांमध्ये सध्या जंगलांतून पकडून आणलेल्या हजारो माकडांचा वापर केला जातो. एकट्या अमेरिकेतील औषध कंपन्या दरवर्षी ३० ते ४० हजार माकडांची यासाठी आयात करत असतात.
क्लोनिंग तंत्रज्ञानाने दोन माकडांचा जन्म, संशोधनासाठी वरदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 01:37 IST