ऑनलाइन टीम
अमृतसर, दि. ६- ऑपरेशन ब्ल्यू स्टारला ३० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त अमृतसरमधील सुवर्णमंदिर येथे आयोजित एका कार्यक्रमात शीख नेत्याला बोलू न दिल्याने सुवर्ण मंदिरा्च्या आवारात दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचे वृत्त आहे. यात सुमारे १२ जण जखमी झाल्याचे समजते.
ऑपरेशन ब्ल्यू स्टारला ३० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सुवर्णमंदिर येथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात अकाली तख्तच्या मंचावरुन सिमरनजीत सिंह मान यांना भाषण द्यायचे होते. मात्र अन्य संघटनांनी याला आक्षेप घेतला. यानंतर दोन शीख गटांमध्ये जोरदार हाणामारी सुरु झाली. संतप्त समर्थकांनी तलवार व काठ्यांनी हाणामारी केल्याचे वृत्तवाहिन्यांनी म्हटले आहे. सुवर्णमंदिर सारख्या पवित्र जागेवर हिंसक घटना घडणे निंदनीय असल्याची प्रतिक्रिया देशभरातून व्यक्त होत आहे.