शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

विश्वासार्ह सरकार

By admin | Updated: May 27, 2017 02:47 IST

नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या तीन वर्षांच्या कारकिर्दीचे विश्लेषण करताना देशभरातील जनताही प्रथम श्रेणीचे गुण म्हणजे ६0 टक्क्यांहून अधिक गुण निश्चितच देईल.

नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या तीन वर्षांच्या कारकिर्दीचे विश्लेषण करताना देशभरातील जनताही प्रथम श्रेणीचे गुण म्हणजे ६0 टक्क्यांहून अधिक गुण निश्चितच देईल. अतिशय आत्मविश्वासाने काम करणारा, जे करायचे आहे, ते वेळोवेळी जनतेला स्वत:हून सांगणारा, भ्रष्टाचाराला थारा न देणारा आणि सरकारी कामकाजात पारदर्शकता आणणारा नेता असेच मोदी यांच्या तीन वर्षांच्या कामकाजाचे वर्णन करता येईल. स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर अनेकदा सत्ताधारी पक्ष आणि त्यांचे नेते सत्तेत मश्गुल होताना दिसतात. पण मोदी यांनी मात्र तसे स्वत:च्या बाबतीत होऊ दिलेले नाही आणि पक्षाच्या नेत्यांवरही वचक ठेवल्याने तेही तसे वागताना दिसलेले नाहीत. मंत्र्यांच्या वाहनांवरील लाल दिवे काढण्याचा निर्णय, अधिकाऱ्यांच्या निष्कारण होणाऱ्या परदेश दौऱ्यांतील कपात, अकार्यक्षम मंत्री वा अधिकाऱ्यांना प्रसंगी सुनावण्याचे प्रकार अशी अनेक उदाहरणे मोदी यांनी सरकारी कामात शिस्त आणण्यासंदर्भात सांगता येतील. त्यामुळेच जनतेच्या मोदी व त्यांच्या सरकारकडून खूप अपेक्षा आहेत. मुळात अनेक वर्षांनी बिगरकाँग्रेसचे सरकार केंद्रात आल्याने जनतेच्या अपेक्षा प्रचंड वाढल्या. त्या सर्व पूर्ण करणे शक्य नसले तरी त्या दृष्टीने सरकार किमान पावले टाकताना या काळात दिसले आहे. मोदी सरकारच्या काळात गरिबी कमी झाली, रोजगार वाढले, भ्रष्टाचार पूर्णत: थांबला, शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला असे काहीच घडलेले नाही. नोटाबंदीमुळे काळ्या पैशाला पूर्णत: आळा बसला वा सर्जिकल स्ट्राइकमुळे पाकिस्तान शांत झाला, असेही या काळात दिसलेले नाही. वास्तविक, गेल्या तीन वर्षांत रोजगार सातत्याने कमी होत असून, आयटी क्षेत्रातील नोकऱ्या ज्या वेगाने जात आहेत, त्यामुळे तरुणांमध्ये घबराटच आहे. शेतकऱ्यांची आंदोलने हमीभावासाठी सुरूच आहेत, कर्जबाजारीपणामुळे त्यांच्या आत्महत्या वाढतच चालल्या आहेत. काश्मीर प्रश्न सोडविणे अवघडच आहे. पण तो सुटावा, यासाठीही पुरेसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. धार्मिक तेढ, जातीय विद्वेष, असहिष्णुता यानिमित्ताने सरकारवर सातत्याने टीका होत आहे. विद्यापीठांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. हे सारे लोकमतने केलेल्या सर्वेक्षणातूनही दिसून आले. तरीही आजच्या स्थितीत देशातील जनतेला खात्री वाटत आहे ती केवळ नरेंद्र मोदी यांची. त्यांना केवळ मोदी हेच आश्वासक नेते वाटतात. ते जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करीत आहेत, यावर जनतेचा विश्वास आहे. मोदी सरकारचे तीन वर्षांतील यशाचे नेमके हेच गमक आहे. सर्व राजकीय पक्षांमध्ये सहमती घडवून जीएसटीचा कायदा संमत करवून घेण्यात हे सरकार यशस्वी ठरले, याचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. तसेच देशाचा विकास साधायचा असेल, तर पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे, हे लक्षात घेत मोदी सरकारने वीज, रस्ते, सागरी वाहतूक, रेल्वे वाहतूक यांत सुधारणा सुरू केल्या. त्या लोकांना भावल्या आहेत. भारताचे परराष्ट्र धोरण मोदी यांच्या नेतृत्वाखाली पूर्णत: यशस्वी झाले, असे म्हणता येत नसले तरी मोदी नावाची जादू जगभरातील सर्व राष्ट्रांच्या नेत्यांवर आहे. त्यांनी सुरू केलेल्या आर्थिक सुधारणांमुळे जगभरातील देशांना भारताचे सतत नाव घ्यावे लागत आहे. स्टार्ट अप इंडिया, मेक इन इंडिया यासारख्या योजना प्रत्यक्षात यायला वेळ लागेल. पण या योजना यशस्वी झाल्याचा फायदा देशालाच होईल. बहुधा यामुळेच गेल्या तीन वर्षांत झालेल्या बहुसंख्य राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये जनतेने भाजपालाच निवडून दिले. अगदी ईशान्येकडील राज्यांत जिथे भाजपा हे नावही नव्हते, तेथील राज्येही त्या पक्षाच्या हातात आली. आपणच देशाचे प्रश्न सोडवू शकतो, हे जनतेच्या मनावर बिंबवण्यात मोदी आणि त्यांचे सरकार यशस्वी ठरले आहे. त्यामुळे काँग्रेससारख्या अनेक वर्षे सत्तेत राहिलेल्या राष्ट्रीय पक्षाला अद्यापही सावरणे अवघड झाले आहे. मात्र आपल्या निर्णयांची फळे पुढील दोन वर्षांत जनतेपर्यंत पोहोचवणे, हे महत्कार्य मोदी सरकारला करावे लागणार आहे. तोपर्यंत अन्य विरोधक सावरणे अवघड असले तरी जनतेला आपल्या अपेक्षा पूर्ण होत आहेत, याची खात्री पटणे गरजेचे आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीला दीड महिना शिल्लक आहे. त्यासाठी उमेदवार सहमतीने निवडला जावा, ही अपेक्षा आहे. निवडणुकांमध्ये यशाच्या अश्वमेधावर स्वार असलेल्या मोदी यांच्यासाठी ही निवडणूक जिंकणे हीच खरी कसोटी असेल.