भरमसाठ वीजबिलाचा ग्राहकांना त्रास
By admin | Updated: August 20, 2015 22:09 IST
तळेघर : महावितरणच्या गलथान कारभारामुळे आंबेगावच्या पश्चिम भागातील वीजग्राहकांना दुप्पट वीजबिले येत आहेत. याचा फटका सर्वसामान्य आदिवासी बांधवांना बसत आहे.
भरमसाठ वीजबिलाचा ग्राहकांना त्रास
तळेघर : महावितरणच्या गलथान कारभारामुळे आंबेगावच्या पश्चिम भागातील वीजग्राहकांना दुप्पट वीजबिले येत आहेत. याचा फटका सर्वसामान्य आदिवासी बांधवांना बसत आहे.आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये वीजबिलाची रीडिंग अंदाजे घेतली जातात. यामुळे लोकांना दुप्पट बिले येतात. पूर्वी तीन महिन्याला येणार्या बिलाची रक्कम आता येणार्या एका महिन्याच्या बिलात दुपटीने दिली जाते. या भागात वीज रीडिंग घेण्यासाठी नवीन पाठविलेल्या कर्मचार्याद्वारे एका ग्राहकाचे मीटर रीडिंग घेऊन बाकीच्या ग्राहकांचे अंदाजे रीडिंग लावले जातात. शिवाय घरांची दारे उघडी असतानाही लॉक दाखवली जातात. मोठ्या आकड्यांच्या येणार्या बिलाला आदिवासी भागातील लोक कंटाळले आहेत. ही अव्वाच्या सव्वा रकमेची बिले भरून आदिवासी लोकांचे कंबरडे मोडले आहे. वीज रीडिंग घेण्याच्या या प्रक्रियेला आदिवासी भागातील लोक कंटाळले आहेत. मागील दोन-तीन दिवसांपूर्वी वीस दिवस पाटण खोर्यातील गावे अंधारात होती. वीजपुरवठा खंडित असूनही या भागातील लोकांना दामदुपटीने बिले आली आहेत. कोणत्याही प्रकारची रीडिंग न घेता अंदाजे वीजबिले दिल्याने या खोर्यातील आदिवासी जनतेचे वीजबिल भरता भरता नाकीनऊ आले आहेत. या भागामध्ये विद्युतपुरवठा खंडित झाला असता महावितरणकडून कोणत्याही प्रकारची तातडीने दुरुस्ती केली जात नाही. यामुळे या खोर्यातील जनतेला दिवसेंदिवस अंधारात राहावे लागते. मात्र, महावितरण कंपनीकडून भरमसाठ वीजबिल दिले जाते. महिन्याला येणार्या बिलामुळे वीजबिलाची रीडिंग कार्यालयात वेळेत पोहोचत नाही. यामुळे या परिसरातील लोकांना नाहक जादा बिले भरावी लागतात. महावितरणने याची दखल घेत पूर्वीप्रमाणे तीन महिन्याने बिलांची सुरुवात करावी व हा गलथान कारभार सुधारावा; नाहीतर श्रावण महिन्याच्या सोमवारी मंचर-भीमाशंकर रस्त्यावर आंदोलन करण्यात येणार असल्याचे आदिवासी भागातील सामाजिक कार्यकर्ते महादू मावळे, तुकाराम वडेकर, लक्ष्मण वडेकर यांनी सांगितले.-----------