ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 17 - भारताचा जवळचाच मित्र असलेल्या रशियाला भारतानं गंभीर इशारा दिला आहे. जर भारताला अणुपुरवठादार देशांच्या समूहाचे (एनएसजी) सदस्यत्व मिळाले नाही, तर आण्विक ऊर्जा कार्यक्रमात परदेशी भागीदारांचा सहयोग घेणं भारत बंद करेल, असा इशारा भारतानं रशियाला दिला आहे. कुडानकुलम आण्विक प्रकल्पासाठी 5वी आणि 6वी अणुभट्टी विकसित करण्यासाठी भारत आणि रशियामध्ये होणा-या कराराला अडगळीत टाकण्याचे सूतोवाच भारतानं केले आहेत. चीनशी रशियाची दिवसेंदिवस जवळीक वाढत असून, भारताला एनएसजी सदस्यत्व मिळावं म्हणून रशिया पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करत नसल्याचा भारताला संशय आहे. त्यामुळेच भारतानं रशियाला हा इशारा दिला आहे. जागतिक मुद्द्यावर चीनसोबत उभा राहणारा रशिया भारताला एनएसजीचं सदस्यत्व मिळवून देण्यासाठी चीनवर दबाव टाकेल, अशी भारताला आशा आहे. तसेच भारत कुडानकुलम कराराला जाणूनबुजून उशीर करत असल्याचीही रशियाला जाणीव आहे. गेल्या आठवड्यात भारताच्या दौ-यावर असलेले रशियाचे उपपंतप्रधान दमित्री रोगोजिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींजवळ भारत आणि रशियामध्ये होणा-या कुडानकुलम आण्विक प्रकल्पाच्या करारासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. भारतानंही या करारासंदर्भात रशियाला अद्याप कोणतंही आश्वासन दिलेलं नाही. पुढच्या महिन्यात रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात एक बैठक होणार आहे. त्या बैठकीच्या पार्श्वभूमीवरच भारताचा रशियावर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे. रशियासारखा मोठा देश भारताला एनएसजीचं सदस्यत्व मिळवून देण्यासाठी चीनला तयार करू शकतो, असा भारताला विश्वास आहे. गेल्या 6 महिन्यांपासून रशिया सामंजस्य करार करण्यासाठी भारताच्या नाकदु-या काढतो आहे. मात्र रशियाला अद्यापही त्याच्यात यश मिळालं नाही. गेल्या वर्षी गोव्यात झालेल्या ब्रिक्स समीटमध्ये हा करार होणार होता. त्यानंतर 2016मध्ये या करारावर स्वाक्षरी करण्यात येईल, असंही सांगण्यात आलं होतं. मात्र 2017 हे वर्ष उजाडलं तरी अद्यापही करार करण्यात आलेला नाही.
भारतावर आली रशियाला इशारा देण्याची वेळ
By admin | Updated: May 17, 2017 15:40 IST