उत्तर प्रदेशच्या संभलमधून एक अजब प्रेमकहाणी समोर आली आहे, या परिसरात राहणाऱ्या 'आई' म्हणायच्या वयाच्या मुलासोबत एका महिलेने संसार थाटला आहे. दोन मुलांच्या या आईने तिच्यापेक्षा तब्बल २० वर्षांनी लहान असलेल्या प्रियकराशी लग्न केले. हे कळताच नवऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने पत्नीसमोर खूप गयावया केली. पण तिने स्पष्ट नकार दिला. "मी तुमच्यासोबत जाणार नाही. आता हाच माझा नवरा आहे. मी आणि माझी दोन्ही मुले याच्याचसोबत राहणार," असे ती ठामपणे म्हणाली.
फेसबुकवर मैत्री जमली, अन् मग... थेट 'घर संसार'
दोन मुलांची आई असलेल्या या महिलेचे तिच्यापेक्षा २० वर्षांनी लहान असलेल्या तरुणासोबत प्रेमसंबंध सुरू झाले. दोघांची ओळख फेसबुकवर झाली होती. सुरुवातीला फोनवर बोलणं सुरू झालं आणि मग ते मुरादाबादमध्ये अनेकदा भेटले. याच भेटीगाठीतून त्यांचे प्रेम इतके वाढले की, एक दिवस ती महिला आपल्या दोन्ही मुलींना घेऊन प्रियकराच्या मुरादाबादमधील छजलैट येथील घरी पोहोचली. तिथे तिने त्या तरुणाशी लग्नही केले.
इकडे पती तिला शोधत तिच्या आईसोबत तिथे पोहोचला, तेव्हा पत्नीला वेगळ्याच रूपात पाहून तो अक्षरशः दंग राहिला. तिच्या भांगेत सिंदूर होता, पण तो दुसऱ्या कोणाच्या तरी नावाचा होता.
पोलीस ठाण्यात घडला हाय व्होल्टेज ड्रामा
पती आणि सासूने तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण तिने त्यांच्यासोबत परत जाण्यास स्पष्ट नकार दिला. तिने स्पष्ट सांगितलं की, "हाच माझा नवरा आहे आणि मी याच्याचसोबत राहीन." त्यानंतर ती महिला आपल्या प्रियकर आणि दोन्ही मुलींसोबत थेट पोलीस ठाण्यात पोहोचली. तिथे संध्याकाळपर्यंत हाय व्होल्टेज ड्रामा सुरू होता.
महिलेचे कुटुंबीयही संभलहून छजलैटला पोहोचले होते, पण विवाहितेने परत जाण्यास स्पष्ट नकार दिला. ती आपल्या दोन्ही मुलींना घेऊन प्रियकरासोबतच निघून गेली. शेवटी, हताश होऊन पती आणि सासूही रिकाम्या हाताने परतले. या घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.
मुलांनाही 'तो' स्वीकारायला तयार
युवकाने विवाहितेला आपल्यासोबत लग्न करून घरी घेऊन जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावर विवाहितेने मुलांना सोबत आणण्याची अट घातली, आणि विशेष म्हणजे, त्या २० वर्षांच्या तरुणाने मुलांनाही स्वीकारण्याची तयारी दाखवली होती.