दलालांना बाहेरच ठेवणार
By admin | Updated: January 31, 2015 00:34 IST
दलालांना बाहेरच ठेवणार
दलालांना बाहेरच ठेवणार
दलालांना बाहेरच ठेवणार-आरटीओची भूमिका : सहायक मोटार वाहन निरीक्षकांवर दिली जबाबदारीनागपूर : परिवहन आयुक्त महेश झगडे यांच्या आदेशानुसार दलालांना प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) बाहेर ठेवण्यासाठी शुक्रवारपासून तीन सहायक मोटार वाहन निरीक्षकांवर जबाबदारी देण्यात आली आहे. मुख्य प्रवेशद्वाराजवळच प्रत्येकाला अडवून त्यांच्या कामाची चौकशी करूनच ते आत सोडतील,अशी माहिती शुक्रवारी प्रादेशिक परिवहन अधिकारी (शहर) सर्जेराव शेळके यांनी पत्रकारांना दिली. दलालांना प्रवेशबंदी करण्याच्या महाराष्ट्र परिवहन आयुक्त महेश झगडे यांच्या १२ जानेवारीच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. या याचिकेवर परिवहन सचिव आणि अकोला प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. याचिकेवरील प्रारंभिक सुनावणीनंतर न्यायालयाने ट्रक असोसिएशनच्या प्राधिकृत प्रतिनिधींना आरटीओ कार्यालयात प्रवेश देण्याचे निर्देश अकोला परिवहन अधिकाऱ्यांना दिले आणि प्रतिवादींना नोटीस बजावली आहे. परंतु हे अकोला आरटीओपुरतेच मर्यादित असल्याने नागपूर शहर आरटीओ कार्यालयात दलालांना प्रवेश बंदी कायम असणार आहे. शेळके म्हणाले, कार्यालयात येणाऱ्यांसाठी नाल्याकाठावरील जागेवर पार्किंगची सोय करण्यात आली आहे. या शिवाय उद्या शुक्रवारपासून एक प्रवेशद्वार बंद करण्यात येणार असून दुसऱ्या मुख्य प्रवेशद्वारावर निरीक्षक उभे राहतील. पत्रपरिषदेत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण व पूर्व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार उपस्थित होते.