शेतमालाबाबत दृष्टिकोन बदलण्याची गरज
By admin | Updated: May 8, 2014 22:06 IST
पाशा पटेल : नाशिक वसंत व्याख्यानमाला
शेतमालाबाबत दृष्टिकोन बदलण्याची गरज
पाशा पटेल : नाशिक वसंत व्याख्यानमालानाशिक : भारतातील शेतकर्यांच्या शेतमालाचा उत्पादन खर्चावर आधारित भाव नसून तो ठरविण्याचा अधिकारही शेतकर्याला नाही. त्यामुळे शेतमालाचा उत्पादन खर्च निघेल असेही भाव मिळत नसल्याने शेतकर्यांवर आत्महत्त्येची वेळ येते. या चुकीच्या पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करण्याची गरज असून, त्याबाबतच्या दृष्टिकोनातच बदल करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी आमदार पाशा पटेल यांनी केले. नाशिक वसंत व्याख्यानमालेअंतर्गत गोदाघाटावर गुप्ते मंदिरात सातवे पुष्प गंुफताना पटेल बोलत होते. गेल्या दहा वर्षांमध्ये एक लाख ४५ हजार शेतकर्यांनी आत्महत्त्या केल्याचे सांगत पटेल म्हणाले, यासाठी नेमलेल्या केंद्राच्या समितीने शेतकर्यांच्या आत्महत्त्या या गृहकलह, दुर्धर आजारपण अन् व्यसनामुळे झाल्याचा निष्कर्ष काढला आहे. शेतकर्याचा पिकाच्या उत्पादन खर्चापोटीही खर्च निघत नसेल अन् त्याच्यासमोरील सर्व मार्ग बंद होत असतील तर त्याला जीवन संपविण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. शेतीवर मजुरी करणार्याची मजुरी वाढली असताना शासन त्याची दखल घेत नाही. बियाणे, पेरणी, खते, मजुरी, वीजबिल, पाणी आदिंसह बाजारापर्यंतचा वाहतूक खर्च याचा हिशेब करून शेतमालाचा भाव ठरणे अपेक्षित असताना तसे होत नाही. उत्पादन घेणारा शेतकरी डावलून व्यापारी भाव ठरवितो. त्यात मूलभूत बदल होणे गरजेचे असून, त्याविरोधात आवाज उठविल्यानंतर राज्याने शेतमाल भाव समितीची पुनर्रचना केली. यात कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली शेतकरी, आमदारांची समिती नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र अद्यापपर्यंत या समितीच्या सूचनांचा गांभीर्याने विचार केला न गेल्याने ही समितीही दर्जा हरवून बसली आहे. केंद्रातही तीच स्थिती आहे. जोपर्यंत शेतकर्यांच्या शेतमालाला त्याच्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत बाजारभाव मिळत नाही तोपर्यंत ही परिस्थिती बदलणार नाही, असेही ते शेवटी म्हणाले. यावेळी व्यासपीठावर चंद्रकांत राजेबहादूर, नगरसेवक तानाजी जायभावे, गोपाळराव पाटील, श्रीकांत बेणी आदि उपस्थित होते. यंदाही तोच अनुभवमहिनाभर चालणार्या वसंत व्याख्यानमालेदरम्यान एक-दोन वेळा पावसाची हजेरी लागते हा नित्याचा अनुभव असताना, आयोजकांकडून यासंदर्भात कोणतीही पूर्वतयारी होत नाही. आजही तेच झाले. दुपारपासून पावसाचे वातावरण असताना गोदाघाटावरच व्याख्यानाचे नियोजन करण्यात आले. नेमकी व्याख्यानाच्या वेळी पावसाने हजेरी लावली आणि ऐनवेळी गुप्ते मंदिरात ते हलविण्यात आले. त्यातच वीजप्रवाह खंडित झाल्याने अंधारातच व्याख्यान पार पडले. आजचे व्याख्यानवक्ते : डॉ. प्रीतेश जुनागडेविषय : रक्तविकार व कॅन्सर : समज-गैरसमज