ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ६ - अरविंद केजरीवाल यांना काही दिवस दिल्लीतील राजकारणातच राहायचे होते. मात्र योगेंद्र यादव व त्यांच्या काही सहका-यांनी केजरीवाल यांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा आग्रह केला. याचा फटका पक्षाला बसल्याचे सांगत पक्षाचे नेते मनिष सिसोदीया यांनी लोकसभेतील पराभवाचे खापर योगेंद्र यादव यांच्यावर फोडले आहे. तर अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वावर शंका घेण्याचे कारण नसले तरी नेता म्हणून त्यांच्या अधिकारांवर निर्बंध आवश्यक असल्याचे परखड मत यादव यांनी मांडले आहे. त्यामुळे आपमध्ये नवीन वाद निर्माण झाला आहे.
लोकसभा निवडणुकीतील आपचा दारुण पराभव झाल्यावर पक्षातील नेत्यांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. हरियाणाची जबाबदारी असलेले योगेंद्र यादव आणि केजरीवाल यांचे विश्वासू साथीदार मनिष सिसोदीया यांच्यात नवीन वाद निर्माण झाला आहे. मनिष सिसोदीया यांनी यादव यांना एक पत्र पाठवले असून यात त्यांनी यादव यांच्यावरच जोरदार टीका केली आहे. सिसोदीया म्हणतात, योगेंद्र यादव व त्यांच्या काही सहका-यांनी केजरीवाल यांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला. केजरीवाल व आम्हाला सध्या दिल्लीतच लक्ष द्यायचे होते. पण तुमच्या सल्ल्यानुसार आम्ही लोकसभेत उतरलो व त्याचे परिणाम आम्हाला आता दिसले.
यादव हे सध्या पक्षाच्या बैठकीला उपस्थित नसतात. यावरही सिसोदीया यांनी जोरदार टीका केली. 'तुम्ही बैठकील न येता ईमेल किंवा पत्र पाठवतात. यातून तुम्हाला काय साध्य करायचे आहे. तुम्हाला पक्ष संपवायचा आहे का ? असा सवालही त्यांनी यादव यांना विचारला आहे. यादव यांनी हरियाणातील आपचे स्थानिक नेते नवीन जयहिंद यांच्यासोबतचे मतभेद जाहीररित्या समोर आणल्याविषयी सिसोदीया यांनी नाराजी व्यक्त केली.
दुसरीकडे योगेंद्र यादव यांनीही आपला एक पत्र पाठवून पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. यात यादव यांनी केजरीवाल यांच्या अधिकारांवर काही प्रमाणात निर्बंध आणण्याची गरज व्यक्त केली. केजरीवाल यांचे नेतृत्व चांगले असले तरी काही वेळेला त्यांच्यामुळे पक्षाला निर्णय बदलावे लागले असे यादव यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यात अंजली दमानिया यांनी गुरुवारी आपच्या सर्व पदांवरुन दिलेला राजीनामा रात्री उशीरा मागे घेतला. आपमधील मतभेदांवर चर्चा करण्यासाठी आज दिल्लीत आपच्या देशभरातील प्रमुख नेत्यांनी एक बैठक होणार आहे.