मणिपूर हिंसाचाराच्या दोन वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपूरच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी आपण मणिपूरच्या जनतेसोबत असल्याचे आश्वासन देत भारत सरकार तुमच्यासोबत असून मणिपूरमध्ये ७ हजार घरे बांधली जाणार आहेत. विस्थापितांसाठी ५०० कोटी रुपये देणार आहे. तसेच ३ हजार कोटींचा निधी मंजूर केला आहे, असे मोदी यांनी सभेमध्ये सांगितले.
मोदी यांनी मणिपूरच्या चुराचांदपूरमध्ये विविध विकासकामांची पायाभरणी केली. एका जाहीर सभेलाही संबोधित केले. मोदी यांच्या दौऱ्यावेळी सभेपासून जवळ असलेल्या कार्यालयासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. अतिरिक्त सुरक्षा दल याठिकाणी तैनात करण्यात आले होते.
मणिपूर हे सीमेला लागून असलेले राज्य आहे. येथे कनेक्टिव्हिटी नेहमीच एक आव्हान राहिले आहे. चांगल्या रस्त्यांच्या कमतरतेमुळे तुमची समस्या मला समजते. आम्ही यावर काम केले आहे. मणिपूरमध्ये रेल्वे मार्ग अनेक पटीने वाढवले. शहरांसह गावांना रस्ते देण्यावर भर देण्यात आला. मणिपूरची भूमी ही आशा आणि आकांक्षांची भूमी आहे. दुर्दैवाने, या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडली होती. विकास कुठेही रुजण्यासाठी शांतता आवश्यक आहे. गेल्या ११ वर्षांत, ईशान्येकडील अनेक संघर्ष आणि वाद सोडवले गेले आहेत. लोकांनी शांततेचा मार्ग निवडला आहे आणि विकासाला प्राधान्य दिले आहे. अलीकडेच डोंगर आणि दऱ्यांमधील विविध गटांशी करार करण्यात आले आहेत.शांतता प्रस्थापित करण्यासाठी काम केले जात आहे, असे मोदी म्हणाले.
चुराचांदपूरमध्ये मेडिकल कॉलेज सुरु केले आहे. येथे सुमारे ६०,००० घरे आधीच बांधली गेली आहेत, ज्यामुळे हजारो कुटुंबांना सन्मानाचे आणि सुरक्षिततेचे जीवन मिळाले आहे. ७-८ वर्षांपूर्वीपर्यंत, मणिपूरमध्ये फक्त २५-३० हजार घरांमध्ये पाईपद्वारे पाणीपुरवठा होता. आज, येथील ३.५ लाखांहून अधिक घरांमध्ये नळाच्या पाण्याची सुविधा आहे, असे मोदी म्हणाले.