ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. २० - जम्मू काश्मीरमधील कथुआ जिल्ह्यातील राजबाग पोलिस ठाण्यावर तिघा दहशतवाद्यांनी शुक्रवारी सकाळी हल्ला केला असून या दहशतवादी हल्ल्यात तीन जवान शहीद झाले आहेत. सुरक्षा दलांनी दोघा दहशतवाद्यांना कंठस्नान घातले असून अद्याप चकमक सुरु आहे.
कथुआ जिल्ह्यातील राजबाग पोलिस ठाण्यावर शुक्रवारी सकाळी तिघा सशस्त्र दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात पोलिस दलातील एक कर्मचारी शहीद झाला. तर सुरक्षा दलाचे दोन जवानही या हल्ल्यात शहीद झाले असून साता-यातील एक जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे. . या हल्ल्यात जखमी झालेल्या एका नागरिकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. हल्ल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी पोलिस ठाण्याला गराडा घालून कारवाईला सुरुवात केली. या कारवाई दरम्यान दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी कंठस्नान घातले.केंद्रीय गृहखात्याने या घटनेनंतर जम्मू काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक व मुख्य सचिवांशी चर्चा करुन परिस्थितीची माहिती घेतली आहे. दहशतवादी रात्री सीमा रेषा ओलांडून भारतात आले व त्यांनी हा हल्ला घडवला असावा असा आरोप जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केला आहे.