ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १८ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉर्पोरेट कंपन्यांनी मुलांसाठी व मुलींसाठी शाळांमध्ये शौचालये बांधावे असे आवाहन केले असतानाच देशातील अग्रगण्य सॉफ्टवेअर कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) मोदींच्या या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. टीसीएसने देशातील १० हजार शाळांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृह बांधण्यासाठी १०० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.
टीसीएसने त्यांच्या बजेटमध्ये कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत शाळांमधील स्वच्छतेसाठी १०० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील १० हजार शाळांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृह बांधले जातील असे टीसीएसच्या वतीने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. यामुळे मुलींच्या शिक्षणावर चांगला परिणाम होईल आणि पुढील पिढीच्या विकासात हातभार लागेल असे टीसीएसचे सीईओ आणि मॅनेजिंग डायरेक्टर एन चंद्रसेकरन यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्यदिनी लालकिल्ल्यावरील भाषणात स्वच्छ भारत मोहीमेची घोषणा केली होती. देशातील शाळांमध्ये शिकणा-या मुलांसाठी व मुलांसाठी स्वतंत्र शौचालय बांधण्यासाठी कॉर्पोरेट कंपन्यांनी पुढाकार घ्यावा. भारतात अशी स्वतंत्र शौचालये नसलेली एकही शाळा असता कामा नये अशी इच्छा मोदींनी व्यक्त केली होती.