ग्राहक धोरण : खा. दर्डा यांच्या प्रश्नावरून कंपन्यांना सूचनानवी दिल्ली : आरोग्य विमा काढणाऱ्या कंपन्यांनी ग्राहकांची फसवणूक होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले असून, दोष आढळल्यास भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरण नियमानुसार कारवाई होऊ शकते, असे अर्थ मंत्री अरूण जेटली यांनी खासदार विजय दर्डा यांनी विचारलेल्या प्रश्नावर राज्यसभेत सांगितले. नॅशनल मेडिक्लेम पॉलिसी बद्दल चर्चा सुरू असताना खा. दर्डा यांनी अर्थ मंत्री जेटली यांना विचारले की, आरोग्यविषयक विमा काढताना कंपन्या किस्त घेतात पण त्यानंतर जेव्हा रूग्णाला प्रत्यक्ष गरज पडते तेव्हा फसवणूक झाल्याचे दिसून येते. प्रीमियम घेतला जातो त्यावेळी ग्राहकांना या पॉलिसीमध्ये कोणते आजार समाविष्ट आहेत, ते समजावून सांगितले जात नाही. ज्यावेळी दवाखान्यात रूग्ण जातो तेव्हा त्याला त्याचा आजार समाविष्ट नसल्याचे सांगण्यात येते. हा प्र्रकार वाढत असून, त्यावर लक्ष देण्याची गरज आहे. फसवणूक होऊ नये म्हणून मंत्रालय अशा कंपन्यांना दिशानिर्देश देईल का, असे खा. दर्डा यांनी विचारले. यावर जेटली म्हणाले, भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरणाने कंपन्याना याबाबत आधीच दिशानिर्देश दिले आहेत. ९० टक्के प्रकरणांमध्ये रूग्णांना मोबदला दिला गेला आहे. काही तक्रारी आल्यास आपण त्याबाबत कारवाई करू. पण विमा काढतानाच ग्राहकांनी विमा कंपन्यांची कागदपत्रे तपासली पाहिजेत. तरीही फसवणूक होत असल्याची भावना झाल्यास ग्राहकांनी भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरणाकडे धाव घ्यायला हवी, असे सांगून कंपन्यांनीही ग्राहकांचा पूर्ण सन्मान ठेवावा,असेही जेटली यांनी स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी)
आरोग्य विमा घेणाऱ्यांची काळजी घ्या
By admin | Updated: March 18, 2015 01:44 IST