वास्को: संशयास्पद पाकिस्तानी बोट गोव्याच्या दिशेने जात असल्याच्या वृत्ताचा तटरक्षक दलाच्या गोवा विभागाने शनिवारी इन्कार केला. अशा प्रकारची बोट गोवा समुद्रात तटरक्षक दलाला आढळलेली नाही. तसेच सुरक्षा यंत्रणांकडूनही या संदर्भात सूचना आली नसल्याचे तटरक्षक दलाने म्हटले आहे. संशयित पाकिस्तानी बोटीचा अरबी समुद्रातील भारताच्या हद्दीत विस्फोट झाल्यानंतर एक संशयित बोट गोव्याच्या दिशेने गेल्याचे वृत्त एका राष्ट्रीय वृत्तपत्रातून दिले होते. या संदर्भात तटरक्षक दलाच्या गोवा कार्यालयात संपर्क साधला असता हे वृत्त खोटे असल्याचे सांगण्यात आले. तटरक्षक दलाचे उपमहानिरीक्षक एम. व्ही. बाडकर यांनी दै. ‘लोकमत’ला सांगितले की, पाकिस्तानी बोटींचा संचार हा केवळ गुजरात नजीकच्या सागरी क्षेत्रापुरताच मर्यादित होता. गोव्याच्या दिशेन अशी कुठलीही बोट आली नाही.गोवा किनारपट्टीच्या दिशेने बोट निघाली असती तर सर्वात अगोदर तटरक्षक दलाला सूचना मिळाल्या असत्या आणि एव्हाना तटरक्षक दलाच्या कारवायाही सुरू झाल्या असत्या असे तटरक्षक दलाचे लोकसंपर्क अधिकारी अक्षय जैन यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
संशयास्पद बोट गोव्यात नसल्याचा खुलासा
By admin | Updated: January 4, 2015 01:47 IST