पणजी : सहकारी महिला पत्रकारावर लैंगिक अत्याचाराचा आरोप असलेला ‘तहलका’चा संस्थापक तरुण तेजपालने सर्वोच्च न्यायालयाने बचावासाठी दस्तऐवज व पुरावे गोळा करण्यास तीन आठवड्यांची मुदत दिली आहे. तेजपालने आवश्यक ती कागदपत्रे द्यावीत, असे न्यायालयाने गोवा पोलिसांना बजावले आहे. त्यामुळे प्रकरणाची सुनावणी तीन आठवडे स्थगित ठेवल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. बचावासाठी आपण अजून आवश्यक ते पुरावे तसेच कागदपत्रे गोळा करू शकलेलो नाही, त्यामुळे आपल्याला थोडा अवधी द्यावा, अशी मागणी तेजपालने सर्वोच्च न्यायालयात केली होती. लैंगिक अत्याचार प्रकरणात गोव्यातील न्यायालयात त्याच्याविरुद्ध सुनावणी चालू आहे. दूरध्वनीविषयक नोंदी, तसेच असंपादित सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फूटेज आपल्याला मिळालेले नाही, असे त्याचे म्हणणे आहे. गोवा पोलिसांनी याच पुराव्यांच्या आधारे त्याच्यावर आरोपपत्र ठेवले आहे. न्यायमूर्ती एच. एल. दत्तू यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने तेजपाल यालाही यापुढे कोणत्याही कारणास्तव खटल्यास विलंब करू नये, असे बजावले आहे. (खास प्रतिनिधी)
तेजपाल प्रकरणी सुनावणीस स्थगिती
By admin | Updated: January 17, 2015 02:20 IST