ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ६ - १६ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदावर सुमित्रा महाजन विराजमान झाल्या असून त्यांच्या रूपाने लोकसभेचे अध्यक्षपद चौथ्यांदा मराठी व्यक्तीकडे आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता. सर्वपक्षीय सहमतीमुळे महाजन यांचाच एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. शुक्रवारी महाजन यांची लोकसभा 'अध्यक्ष' म्हणून बिनविरोध निवड झाली. मावळत्या अध्यक्ष मीरा कुमार यांच्यानंतर सलग दुस-यांदा हे पद महिला नेत्याकडे सोपवण्यात आले आहे.
कोण आहेत सुमित्रा महाजन?
हसतमुख व्यक्तिमत्त्वाच्या महाजन ‘ताई’ या नावाने लोकप्रिय आहेत. १९८९पासून सलग आठ वेळा लोकसभेत प्रतिनिधित्व करत असलेल्या त्या एकमेव महिला आहेत. चिपळूणमध्ये (रत्नागिरी) जन्म झालेल्या सुमित्रा महाजन पूर्वाश्रमीच्या साठे. त्यांचे वडील पुरुषोत्तम साठे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चिपळूणचे संघचालक होते. विवाहापूर्वी महाजन यांनी मुंबईत महालेखापाल कार्यालयात काही काळ नोकरी केली. अॅड. जयंत महाजन यांच्याशी विवाहबद्ध होऊन त्या इंदूरवासी झाल्या. मध्य प्रदेशात मराठी भाषकांचे प्राबल्य असलेल्या इंदूर शहराच्या लोकप्रिय नेत्या अशी त्यांची ओळख आहे. त्या २००२-०४ या काळात मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि पेट्रोलियम खात्याच्या राज्यमंत्री होत्या.