हुंड्यासाठी छळ, नवविवाहितेची आत्महत्या
By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST
नागपूर : हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून एका नवविवाहितेने बुधवारी रात्री गांधीसागर तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. तिच्या लग्नाला फक्त ११ महिने झाले होते.
हुंड्यासाठी छळ, नवविवाहितेची आत्महत्या
नागपूर : हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून एका नवविवाहितेने बुधवारी रात्री गांधीसागर तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. तिच्या लग्नाला फक्त ११ महिने झाले होते.सुलोचना ननदेव राठोड (२०) रा. शनिवारी कॉटन मार्केट, असे मृत महिलेचे नाव आहे. सुलोचना मूळची यवतमाळ जिल्ह्यातील मांडवी येथील रहिवासी होती. तिचा १८ एप्रिल २०१४ ला घाटंजी येथील ननदेवशी विवाह झाला होता. ननदेव एम्प्रेस मॉलमधील व्हिलेज हॉटेलमध्ये काम करीत होता. सुलोचनाचे वडील दत्ता पवार यांची आर्थिक परिस्थिती नाजूक होती. सुलोचनाच्या लग्नासाठी त्यांनी वडिलोपार्जित जमीन गहाण ठेवली होती. एकुलती एक मुलगी असल्याने ती वडिलांची लाडकी होती. लग्नानंतर काही महिन्यानेच सुलोचनाचा हुंड्यासाठी छळ सुरू झाला. त्याला कंटाळून अखेर ती माहेरी निघून गेली. दीड महिन्यापूर्वीच ती नागपूरमध्ये परत आली होती. तिचा पुन्हा छळ सुरू झाला. बुधवारी सायंकाळी ननदेवने सुलोचनाची आई बेबीबाईला फोन करून पाच ग्रॅमच्या अंगठीची मागणी केली. मात्र आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने ती देण्यास बेबीबाईंनी असमर्थता व्यक्त केली. ननदेवच्या नातेवाईकांनी यासाठी आणखी दबाव वाढविला. एकीकडे वडिलांची हलाखीची परिस्थिती व दुसरीकडे होणारा छळ याला कंटाळून अखेर सुलोचनाने बुधवारी रात्री १० वा. गांधीसागर तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. गणेशपेठ पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. पण सुलोचनाच्या आई-वडिलांच्या बयानानंतर ननदेवच्या विरोधात हुंडाबळीचा गुन्हा नोंदविण्यात आला. दरम्यान, सुलोचनाच्या मृत्यूने तिच्या आई-वडिलांना जबर धक्का बसला आहे. तिला पोहता येत असतानाही तिचा बुडून मृत्यू झाल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. (प्रतिनिधी)