आत्महत्या प्रकरण
By admin | Updated: August 27, 2015 23:45 IST
पंचायत समिती सदस्य पत्नीची
आत्महत्या प्रकरण
पंचायत समिती सदस्य पत्नीचीआत्महत्या, पती निर्दोषनागपूर : हिंगणा पंचायत समितीची सदस्या अस्मिता राजेश बोरकर हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपातून अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. टी. घोटेकर यांच्या न्यायालयाने आरोपी पतीची निर्दोष सुटका केली. राजेश बाळकिसन बोरकर (४०) रा. एमआयडीसी, असे आरोपी पतीचे नाव आहे. प्रकरण असे की, राजेश आणि अस्मिताचा विवाह २००५ मध्ये झाला होता. त्यांना तनिष्का नावाची ८ वर्षांची मुलगी आहे. राजेश हा अस्मिताच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करीत असल्याने तिने १२ नोव्हेंबर २०१३ रोजी गळफास लावून आत्महत्या केली होती. मृताचे वडील नत्थूजी मेश्राम यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी भादंविच्या ३०६, ४९८-अ कलमान्वये गुन्हा दाखल करून राजेश बोरकरला अटक केली होती. बचाव पक्षाच्या वकिलाने युक्तिवादात न्यायालयाला सांगितले की, लग्नानंतर आरोपी राजेशने अस्मिताला शिकवले होते. तिला भाजपचे तिकीट मिळवून देऊन निवडणुकीत उभे केले होती. ती पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आली होती. ती रागीट होती. रात्री-बेरात्री बाहेर जाऊ नको, असे सांगूनही ती जायची. त्यामुळे रागाच्या भरात तिने हे कृत्य केले. बचाव पक्षाचे म्हणणे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी पतीची निर्दोष सुटका केली. न्यायालयात आरोपीच्या वतीने ॲड. चंद्रशेखर जलतारे, सरकारच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील माधुरी मोटघरे तर फिर्यादीच्या वतीने ॲड. योगेश मंडपे यांनी काम पाहिले.