पत्नी व मुलाचे आत्महत्या प्रकरण
By admin | Updated: February 18, 2015 00:12 IST
पत्नी व मुलाच्या मृत्युप्रकरणी आरोपी पती निर्दोष
पत्नी व मुलाचे आत्महत्या प्रकरण
पत्नी व मुलाच्या मृत्युप्रकरणी आरोपी पती निर्दोषहुडकेश्वर भागातील शोकांतिकानागपूर : पत्नी आणि मुलास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपातून अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती एन. टी. घोटेकर यांच्या न्यायालयाने आरोपी पतीची निर्दोष सुटका केली. उमेश रामचंद्र पोटफोडे (४०) रा. बांते ले-आऊट, असे आरोपीचे नाव आहे. सुचिता आणि अर्चित पोटफोडे, अशी मृतांची नावे होती. या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी, उमेश हा घटनेच्या वेळी महावितरणमध्ये कर्मचारी होता. त्याचे लग्न सुचितासोबत २००२ मध्ये झाले होते. ११ डिसेंबर २०१२ रोजी पहाटेच्या वेळी सुचिताने आठ वर्षांचा मुलगा अर्चित याला विष दिले होते तर स्वत: गळफास लावून आत्महत्या केली होती. मृत सुचिताचा भाऊ योगेश वनवे याने हुडकेश्वर पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंविच्या ३०६, ४९८ (अ) कलमान्वये गुन्हा दाखल करून उमेशला अटक केली होती. पोलीस उपनिरीक्षक अजित जाधव यांनी तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले होते. त्यात मृत सुचिताचा भाऊ, आई आणि वहिनीचा समावेश होता. वडिलांचा प्लॉट माझ्या नावे करून दे, असा तकादा लावून आरोपी उमेश हा सुचिताचा मानसिक व शारीरिक छळ करीत होता. तिला घराबाहेर काढून देत होता, असे त्यांनी आपल्या साक्षीत सांगितले होते. बचाव पक्षाच्या वतीने युक्तिवाद करताना न्यायालयाला सांगण्यात आले की, आरोपीनेच मृताच्या वडिलांच्या प्लॉटवर बांधकाम करण्यास पैसे दिले होते. मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीतही सुचिताने पतीने पैसे दिल्याचा उल्लेख केला होता. भावाच्या वागणुकीला कंटाळून सुचिताने आत्महत्या केली असावी, वडिलांच्या मृत्यूनंतर तिला एकाकी वाटत होते. आरोपीने कधीही तिला त्रास दिला नाही. संपत्ती बळकावण्यासाठी योगेशनेच खोटा रिपोर्ट दाखल केला, असा बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीची निर्दोष सुटका केली. न्यायालयात आरोपीच्या वतीने ॲड. चंद्रशेखर जलतारे तर सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील अर्चना नायर यांनी काम पाहिले.