नवी दिल्ली : उच्च न्यायालयाने व्यक्त केलेल्या मताला न जुमानता येथील जामा मशिदीचे शाही इमाम सैयद अहमद बुखारी यांनी शनिवारी सायंकाळी आपल्या धाकटय़ा मुलाची नायब इमाम म्हणून औपचारिकपणो नेमणूक केली.
17 व्या शतकातील या ऐतिहासिक मशिदीत झालेल्या दस्तबंदी कार्यक्रमात शाही इमाम बुखारी यांनी सांगितले की, शबान बुखारी यांची जामा मशिदेचे नायब इमाम म्हणून मी घोषणा करतो. आम्हा सर्वाच्या अपेक्षा ते पूर्ण करतील, अशी मला आशा आहे.
19 वर्षाचे शबान बुखारी सध्या एका खासगी विद्यापीठात समाजसेवा पदवी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आहेत. नायब इमाम झाल्याने ते देशातील या सर्वात मोठय़ा मशिदीचे भविष्यात मुख्य इमाम व्हावेत, यासाठी ही योजना आहे. मात्र शाही इमामांनी आपला उत्तराधिकारी स्वत: नेमण्यास कोणतेही कायदेशीर अधिष्ठान नाही व दस्तरबंदी झाली तरी शबान बुखारी यांना ते पद मिळाले असे होत नाही, असे दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट केले होते. (लोकमतन्यूज नेटवर्क)