बुधवारपासून अधिक मासास प्रारंभ
By admin | Updated: June 15, 2015 21:29 IST
ठाणे : बुधवार म्हणजे १७ जूनपासून अधिक आषाढ महिन्याचा प्रारंभ होत असून गुरुवारी १६ जुलै रोजी अधिक आषाढ महिना संपणार असल्याचे पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांनी सांगितले.
बुधवारपासून अधिक मासास प्रारंभ
ठाणे : बुधवार म्हणजे १७ जूनपासून अधिक आषाढ महिन्याचा प्रारंभ होत असून गुरुवारी १६ जुलै रोजी अधिक आषाढ महिना संपणार असल्याचे पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांनी सांगितले. ऋतू हे सूर्यावर अवलंबून असतात, तर आपले सण, व्रतवैकल्ये चंद्रावर अवलंबून असतात. सण, व्रतवैकल्ये ठराविक ऋतूत येण्यासाठी चांद्र-सौर पद्धतीचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला गेला आहे. यामुळेच अधिक मास येत असतो. अधिक मासानंतर नीज मास येत असतो. पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्याकरिता ३६५ दिवस ५ तास ४८ मिनिटे आणि ४६ सेकंद लागतात. त्यालाच सौरवर्ष म्हटले जाते. चंद्राला पृथ्वीभोवती १२ प्रदक्षिणा पूर्ण करण्याकरिता ३५४ दिवस ८ तास ४८ मिनिटे आणि २४ सेकंद एवढा कालावधी लागतो. त्यामुळे दरवर्षी चांद्र-सौर वर्षाच्या काळात सुमारे ११ तिथींचा फरक पडत जातो. सुमारे तीन वर्षांनी अधिक महिना येतो. एका राशीत सूर्य असताना दोन चांद्र महिन्यांचा प्रारंभ झाला की, पहिला तो अधिक मास आणि दुसरा तो नीज मास समजला जातो. दोन अधिक मासांत जास्तीतजास्त ३५ तर कमीतकमी २७ महिन्यांचा कालावधी जातो. यापूर्वी २०१२ मध्ये भाद्रपद अधिक मास आला होता. या वर्षी आषाढ अधिक मास तर २०१८ मध्ये ज्येष्ठ, २०२० मध्ये आश्विन, २०२३ मध्ये श्रावण, २०२६ मध्ये ज्येष्ठ तर २०२९ मध्ये चैत्र अधिक मास येणार असल्याचे त्यांनी सांगितले. अधिक मासात दान देण्यास सांगितले आहे. आषाढ अधिक मास आला असताना कोकिळा व्रत करण्यास सांगितले आहे. गुरुवार, ३० जुलैपासून शनिवार, २९ ऑगस्टपर्यंत कोकिळा व्रत करावयाचे आहे. कोकीळ पक्ष्याचा आवाज ऐकून उपास सोडण्यास सांगितले आहे. गावात कोकीळ पक्षी असावा, असा त्यामागचा उद्देश असू शकतो, असे त्यांनी सांगितले.................वाचली - नारायण जाधव