सतना/भोपाळ : मध्य प्रदेशातील सतना शहरापासून सुमारे ८० कि.मी. अंतरावरील कामतानाथ पहाड मंदिरात सोमवारी पहाटे झालेल्या चेंगराचेंगरीत दहा भाविक मृत्युमुखी पडले, तर ६० पेक्षा अधिक जण जखमी झाले. मृतांमध्ये सहा महिलांचा समावेश आहे़ दरम्यान मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. सोमवती अमावस्येनिमित्त पहाटे मंदिरात भाविकांची मोठी गर्दी उसळली़ यावेळी कामतानाथ पहाड दंडवत परिक्रमा सुरूअसताना चेंगराचेंगरीची झाली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दंडवत परिक्रमेदरम्यान दोन भाविक खाली पडल्यामुळे धावपळ सुरू झाली़ याची परिणती चेंगराचेंगरीत होऊन दहा भाविक मृत्युमुखी पडले. जखमींचा अधिकृत आकडा कळू शकला नसला तरी यात ६० जण जखमी झाल्याचे सांगण्यात येते़ मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपये तर गंभीर आणि किरकोळ जखमींना अनुक्रमे ५० हजार व १० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे़ (वृत्तसंस्था)
मध्यप्रदेशातील मंदिरात चेंगराचेंगरी
By admin | Updated: August 25, 2014 23:43 IST