ऑनलाइन टीम
इस्लामाबाद, दि. १४ - पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाच्या म्हणजे १४ ऑगस्टच्या पूर्वसंध्येला जनतेला संबोधित करताना पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी काश्मिरचा प्रश्न उकरून काढला असून भारत - पाकिस्तानमधल्या संबंधांमध्ये काश्मिरच मुख्य असल्याचे पुन्हा सांगितले आहे. विशेष म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
त्याआधी, पाकिस्तानची भारताशी थेट युद्ध छेडण्याची क्षमता नसल्याने दहशतवाद्यांच्या माध्यमातून लढत असल्याचे मोदींनी सांगितले होते. त्यावरून दोन्ही देशांमध्ये काहीसा तणावही निर्माण झाला होता. दोन्ही देशांच्या तणावपूर्ण संबंधांना पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद कारणीभूत असल्याची भारताची भूमिका आहे. तर काश्मिर प्रश्न मूळ असल्याचे पाकिस्तान सांगत असून शरीफ यांनीदेखील याचा पुनरुच्चार केला आहे.
पाकिस्तानला अंतर्गत शांतता हवी असून शेजारी राष्ट्रांशीही सलोख्याचे संबंध ठेवण्यात रस असल्याचेही शरीफ यांनी म्हटले आहे. अफगाणिस्तानमध्ये कायमची शांतता नांदणेही पाकिस्तानच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.